एकाच वर्षात दोनदा बिनविरोध, तिसऱ्यांदा काय होणार? कातरणीत एकाच वर्षात तिसऱ्यांदा निवडणूक

येवला (जि.नाशिक) : मार्च २०२० व जानेवारी २०२१ या दोन्ही निवडणुकीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यानंतरही कातरणी येथे एकाच वर्षात तिसऱ्यांदा निवडणूक लागली आहे. लागोपाठ दोनदा बिनविरोध झाल्यानंतर आता तिसऱ्यांदा काय होणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

आता तिसऱ्यांदा काय होणार?

शेवटच्या दिवसापर्यंत येथे ११ जागांपैकी ३ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित ८ जागासाठी २४ अर्ज दाखल झाल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे. 
येथील निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारी २०२० रोजी जाहीर झाला होता. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत येथे ११ जागांसाठी ११ अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा होती. मात्र कोरोना वाढल्याने निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. बिनविरोध होऊनही येथील निवडणूक स्थगित झाली होती. त्यानंतर जानेवारीत जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. 

 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

लिलाव झाल्याची तक्रार
त्यावेळीही एकोप्याने येथील निवडणूक बिनविरोध झाली होती. एकूण जागेच्या तुलनेत दोन अर्ज जादा असल्याने निवडणूक लागणार का अशी शक्यता असताना माघारीच्या शेवटच्या दिवशी अधिक अर्ज माघारी होऊन निवडणूक बिनविरोध झाली होती. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी लिलाव झाल्याची तक्रार पुराव्यासह करण्यात आल्याने निवडणूक आयोगाने उमराणेपाठोपाठ कातरणीची निवडणूक रद्द ठरविल्याने आता वर्षातच येथील ग्रामस्थांना तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जावे लागण्याची वेळ आली आहे. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

आता काय होणार? 
निवडणूक आयोगाने पुन्हा निवडणूक १२ मार्चला घेण्याचे जाहीर केले. यासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा तीन वाजेपर्यंत शेवटची मुदत होती. त्यानुसार येथील ३ जागावर प्रत्येकी एकच अर्ज आले असून, ८ जागांसाठी २४ अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार प्रमोद हिले यांनी दिली. सहा जागांवर अर्ज आल्याने उत्सुकता अधिकच ताणली आहे. शुक्रवारी (ता.२६) माघारीचा शेवटचा दिवस असून, या दिवशीच येथील निवडणूक पुन्हा बिनविरोध होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. उर्वरित जागा ही बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच वेळी काही युवकही सक्रिय झाल्याने या जागा बिनविरोध होणार का याविषयी प्रश्नचिन्हच आहे. ज्यांनी तक्रार केली, तो वॉर्ड मात्र बिनविरोध होण्याची शक्यता कमीच असल्याचेही सांगितले जाते.