एक चूक अन् तासाभरात संसाराची राखरांगोळीच; तब्बल १५ लाखांचे नुकसान

कळवण (नाशिक) : कळवणच्या फुलाबाई चौकातील जिभाऊ ठाकरे यांच्या घरात रविवारी (ता.२४) दुपारी बाराच्या दरम्यान घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन संसारोपयोगी साहित्य खाक झाले. फरसाण बनविण्याची सामग्री व महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याने मोठे नुकसान झाले. दरम्यान, घटनास्थळी आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार, तहसीलदार बी. ए. कापसे, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांनी धाव घेतली. आमदार पवार यांनी घटनेचा पंचनामा करून शासकीय मदत देण्याची सूचना या वेळी यंत्रणेला केली. 

अशी आहे घटना

जिभाऊ ठाकरे यांच्या फुलाबाई चौकातील घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत फरसाण बनविण्यासाठीचा आवश्यक किराणा बाजार, सामग्रीसह महत्त्वाची कागदपत्रे जळाली. या दुर्घटनेमुळे ठाकरे यांचे १५ लाखांचे नुकसान झाले. सटाणा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. तीन तास आगीने रौद्र रूप धारण केले होते. कळवण नगर पंचायतीकडे अग्निशमन बंब व पथक नसल्याने सटाणा नगर परिषदेचे अग्निशमन वाहन बोलावण्यात येऊन मदतकार्य केले. कळवण नगरपंचायत, पोलिस ठाणे, महसूल यंत्रणेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

फुलाबाई चौकातील सामाजिक कार्यकर्ते राहुल पगार, चेतन पगार, प्रल्हाद शिवदे, बाळा निकम, टिनू पगार, राजेंद्र पगार, प्रदीप पगार, टग्या शेख, सचिन शिवदे, लौकिक शेख यांनी मदतकार्य केले. घटनास्थळी तहसीलदार बी. ए. कापसे, कळवणचे मुख्याधिकारी सचिन पटेल, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, मंडळ अधिकारी मनोज गांगुर्डे यांनी भेट देत पाहणी केली. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच