एनडीए अन् इंडियासोबतही युती नाही : राजू शेट्टींनी केलं स्पष्ट

राजू शेट्टी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एनडीए’, तर विरोधकांची ‘इंडिया’ अशा दोन आघाड्यांमध्ये राजकीय पक्षांची विभागणी होताना दिसत आहे. मात्र, या दोन्हींकडे जाणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दि. 1 जुलैपासून राज्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान सुरू केले आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी (दि. 20) नाशिक येथे दाखल झालेल्या शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजकीय घडामोडींवर टिप्पणी केली. महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा पुरता खालावला आहे. सत्ताधाऱ्यांना तर कुठलेही देणेघेणे नसल्याचे त्यांनी सांगितले. २०१९ मध्ये आम्ही राजकीय आघाडीत जाण्याचा निर्णय उसाच्या एफआरपीसाठी घेतला होता. मात्र त्यावेळी निर्णय घेताना आम्हाला कोणीही विश्वासात घेतले नव्हते. त्यामुळे आम्ही कोणत्याही आघाडीसोबत जाणार नाही. दोन्ही आघाड्यांशी आमचा काहीही संबंध नसल्याचे ते म्हणाले.

भूमी लेखाचा कायदा करताना तसेच जमिनी अधिग्रहित करताना मविआने त्यात दुरुस्ती करून शेतकऱ्यांवर अन्याय केला. राजकीय नेते सत्ता नसताना शेतकऱ्यांच्या बाजूने असतात, पण सत्तेत गेल्यावर शेतकऱ्यांच्या विरोधात जातात. राज्यातील सध्याचे चित्र तर अत्यंत गंभीर व चिंताजनक झाले आहे. कोण कधी फुटेल माहीत नाही, अजूनही वेळ आहे. मतदार या सगळ्यांना सोडून नवीन आश्वासक चेहरा निवडून देतील, असे वाटत असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाची ऑफर

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मलाही मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून के. चंद्रशेखर राव संपर्कात आहेत. दरम्यान, राजू शेट्टी यांनी केसीआर यांची ऑफर नाकारली आहे. राज्यात आगामी सर्व निवडणुका लढवण्याची घोषणा केसीआर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे राजू शेट्टी यांनीही आगामी निवडणुका स्वतंत्र राहूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

इर्शाळवाडी दुर्घटनेला सरकारची अनास्था जबाबदार

इर्शाळवाडी दुर्घटनेला सरकारचे धोरण आणि अनास्था जबाबदार आहे. अशा घटना अकस्मात घडत नाहीत. त्यांचा आधीच अंदाज येतो. सरकारने तो धोका स्थानिकांच्या लक्षात का आणून दिला नाही? दुर्गम भागात धोकादायक वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्राधान्याने घरे देऊन दुर्घटना टाळता आली असती. त्यात सरकार कमी पडले, अशी टीकाही शेट्टी यांनी केली.

हेही वाचा : 

The post एनडीए अन् इंडियासोबतही युती नाही : राजू शेट्टींनी केलं स्पष्ट appeared first on पुढारी.