एप्रिलपासून नाशिक शहरातील रेल्वे आरक्षण केंद्र होणार बंद; रेल्वे व प्रवाशांना बसणार फटका

नाशिक रोड : नाशिक शहरातील शरणपूर रोडवरील तिबेटियन मार्केट परिसरातील रेल्वेचे तिकीट रिझर्व्हेशन (आरक्षित) कार्यालय १ एप्रिलपासून कायमचे बंद होण्याची शक्यता आहे. महापालिकेने वार्षिक दर कमी करावेत, अन्यथा १ एप्रिलपासून रेल्वेकडून रिझर्व्हेशन कार्यालय बंद करण्यात येईल, असे पत्र भुसावळच्या रेल्वे कार्यालयाने नाशिक महापालिकेला पाठविले आहे. आरक्षण कार्यालय बंद झाल्यास रेल्वेला व प्रवाशांना मोठा फटका बसू शकतो. 

रेल्वे आरक्षित कार्यालय १ एप्रिलपासून बंद 
नाशिक रोड रेल्वेस्थानकावरून देशाच्या विविध राज्यांत जाण्यासाठी तिकीट आरक्षित करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, शहरातील लोकांना नाशिक रोडला येऊन तिकीट आरक्षित करणे त्रासदायक असल्याने रेल्वेकडून खास प्रवाशांच्या सोयीसाठी शरणपूर परिसरात १३ वर्षांपूर्वी रिझर्व्हेशन कार्यालय सुरू केले आहे. दोन गाळ्यांमध्ये तिकीट आरक्षित बुकिंगचे काम चालते. महापालिकेने वार्षिक दर पाचपटीने वाढविल्याने कार्यालय सुरू ठेवणे परवडत नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेने २०१५ प्रमाणेच दर आकारावेत, अन्यथा १ एप्रिलपासून रिझर्व्हेशन कार्यालय बंद करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले आहे. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

महापालिकेला दर कमी करण्यासाठी रेल्वेचे पत्र 
दरम्यान, शहरातील रिझर्व्हेशन कार्यालय बंद झाल्यास त्याचा मोठा फटका नागरिकांना बसणार आहे. सध्याच्या घडीला या ठिकाणी सकाळी तीन व दुपारी तीन, अशा सहा खिडक्या दिवसातून दोन वेळेस सुरू असतात. सकाळी आठ ते दुपारी दोन व दुपारी दोन ते रात्री आठ या वेळेत तिकीट आरक्षित करण्याची वेळ असल्याने शहरातील नागरिकांना तिकीट काढणे सोयीचे ठरते. नाशिक रोड रेल्वेस्थानक परिसरात रिझर्व्हेशन कार्यालय असले, तरी शहरातील नागरिकांसाठी शरणपूर रोडवरील कार्यालयच सोयीचे आहे. आरक्षित तिकीट कार्यालय बंद करू नये, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत. यावर महापालिकेने काही तोडगा काढण्याची मागणी होऊ लागली आहे. सध्या महापालिकेला रेल्वेकडून वर्षाकाठी तीन लाख रुपये भाडे दिले जाते. यापूर्वी अवघे ६० हजार रुपये एवढेच दर असल्याने ते परवडत असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

आरक्षित कार्यालयाचे दर कमी करण्यासाठी आम्ही नाशिक महापालिकेला पत्र पाठविले आहे. वार्षिक भाडे परवडणारे नाही. महापालिकेकडे २०१४- २०१५ प्रमाणे भाडे आकारण्याची मागणी केली आहे. भाडे कमी न झाल्यास १ एप्रिलपासून तिकीट आरक्षित कार्यालय बंद करण्यात येईल, असे महापालिकेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. -अरुणकुमार, मंडल वाणिज्य प्रबंधक, डीसीएम, भुसावळ 

शहरात कार्यालय सुरू ठेवायला हवे. महापालिकेच्या संकुलात नसेल तर इतर ठिकाणीही सुरू ठेवल्यास वावगे ठरणार नाही. शहरातील नागरिकांना नाशिक रोडला येण्याची गरज भासू नये, यासाठी रेल्वेने उपाययोजना करायला हवी. -संजय खालकर, प्रवासी