एमडी विक्रीत छोटी भाभीच्या पतीसह दोघे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; अमली पदार्थ विरोधी पथकाने सामनगाव आणि वडाळा गावातील एमडी विक्री प्रकरणात दोघांना अटक केली आहे. यात सुरुवातीस अटक केलेल्या छाेटी भाभीचा पती इम्तियाज ऊर्फ चिकन्या ऊर्फ राजा उमर शेख (३२, वडाळा गाव) व अनिल ऊर्फ गुड्ड्या शांताराम चौधरी (१९) या तरुणाचा समावेश आहे. (Nashik Drug Case)

शहर पोलिस एमडी विक्री प्रकरणी तीन गुन्ह्यांचा तपास करीत आहेत. त्यात शिंदे गावात उद्ध्वस्त केलेला एमडी कारखाना, सामनगाव येथील युवकास एमडीसह पकडले त्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा व वडाळा येथे छोटी भाभीसह आणखी एकास एमडी व गांजासह पकडलेल्या गुन्ह्याचा समावेश आहे. या गुन्ह्यांचा तपास अमली पदार्थ विरोधी पथक करीत असून, तीनही गुन्ह्यांचे धागेदाेरे एकमेकांना जुळत असल्याचे समोर येत आहे. सामनगाव रस्त्यावरून तरुणाकडून जप्त केलेल्या १२ ग्रॅम एमडी प्रकरणात तिसऱ्या संशयिताला अटक झाली होती. त्याला पुरवठा करणाऱ्याला गोविंदा संजय साबळे (२१, अरिंगळे मळा) याच्या कसून चौकशीत त्याने पथकाला माहिती दिली. त्यानुसार संशयित गुड्ड्याकडून ‘एमडी’ मिळत होते. त्याला पैसे देताना ‘क्यू-आर कोड’चा वापर व्हायचा. या ‘क्यू-आर कोड’वरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी पथकास तपास करण्यास सांगितले. त्यानुसार पथकाने तपास केला. गुड्डूने दिलेल्या जबाबानुसार नाशिकरोड परिसरातील आणखी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी नाशिकसह राज्यातील इतर भागांत एनडीपीएस पथक तपास करीत आहे. (Nashik Drug Case)

इम्तियाज ड्रग्ज आणायचा

५ ऑक्टोबर रोजी पथकाने वडाळा गावातील झोपडीतून ५४.४ ग्रॅम एमडीसह एक किलो गांजा हस्तगत केला. या प्रकरणात दोघांना अटक झाली. त्यांच्या मोबाइलची तपासणी केल्यनांतर पथकाने छोटी भाभीचा पती इम्तियाज याला ताब्यात घेत चौकशी केली. त्यात इम्तियाजने एमडी ड्रग्ज खरेदी करून वडाळ्यात आणून पत्नीमार्फत विक्री करायचा. हे ड्रग्ज त्याने कोठून, कोणाच्या मदतीने मिळवले याचा तपास पोलिस करीत आहेत.

हेही वाचा :

The post एमडी विक्रीत छोटी भाभीच्या पतीसह दोघे गजाआड appeared first on पुढारी.