एसटीची प्रवासी वाहतूक पोचली ७० टक्क्यांपर्यंत; महामंडळाचे विभागीय नियंत्रकांची माहिती

नाशिक : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवरील ‘अनलॉक’नंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत पोचले आहे. नाशिक-पुणे मार्गावर सर्वाधिक वाहतूक व्हायची. त्यात सुधारणा होत असताना वाशीम, हिंगोली, अमरावती, नागपूर, अकोला, शेगाव अशा नव्या मार्गांवर प्रवासी वाहतूक सुरू झालेली आहे. तसेच शाळा-महाविद्यालये सुरू होताच, एसटीची चाके सर्वत्र धावतील, अशी माहिती महामंडळाचे विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांनी मंगळवारी (ता. १९) दिली. ‘सकाळ’च्या सातपूर कार्यालयात झालेल्या ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमांतर्गत ते बोलत होते.

शाळा-महाविद्यालये सुरू होताच चाके धावतील सर्वत्र 

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळातील ‘लॉकडाउन’मध्येसुद्धा एसटीने अत्यावश्‍यक सेवेसाठी मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय कार्यशाळेतील यंत्र अभियंता मुकुंद कुवर उपस्थित होते. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी स्वागत केले. नाशिक जिल्ह्यातील एसटीच्या १३ आगारांतून पास विक्री वाढली आहे. तीन हजारांवरून ७० हजारांपर्यंत पास विक्री होत आहे. शिवाय ज्येष्ठ नागरिकांचा एसटी बसगाडीतून प्रवास वाढला आहे, असे सांगून मैंद म्हणाले, की कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर बसगाड्यांच्या स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. दिवसाला सर्वसाधारणपणे २७ बसगाड्यांचा कोपरानकोपरा ब्रशने घासून स्वच्छ केला जातो. त्याची माहिती ऑनलाइन दररोज द्यावी लागते. नाशिकहून नागपूरला जाणाऱ्या बसगाड्यांमध्ये आसनक्षमतेच्या ६० टक्क्यांपर्यंत प्रवासी मिळतात. नाशिकच्या नव्या मार्गास मिळणारा हा प्रतिसाद पाहून अकोला-मुंबई, अमरावती-मुंबई, भुसावळ-मुंबई अशा आराम बसगाड्या सुरू झाल्या आहेत. 

स्थलांतरितांच्या वाहतुकीतून १२ कोटींचे उत्पन्न 

स्थलांतरित मजुरांच्या वाहतुकीसाठी एसटीने २४ तास सेवा केली आहे. स्थलांतरितांच्या प्रवासासाठी बसगाड्यांच्या दोन हजार ७०० खेपा करण्यात आल्यात. त्यातून १२ कोटींचे उत्पन्न मिळाले. नाशिकहून मुंबई ते कोलकता अशी प्रवासाची व्यवस्था केली गेली. प्रवाशांना घेऊन निघालेली बसगाडी तिसऱ्या दिवशी पोचली होती. बिहार, छत्तीसगडसाठी बसगाड्या पाठविण्यात आल्या होत्या. सुरवातीच्या काळात नाशिकमधून केलेली प्रवासी वाहतूक ठाण्यापर्यंत विस्तारित करण्यात आली होती, असे सांगून मैंद यांनी मुंबईकरांसाठी दिलेल्या बसगाड्यांची माहिती दिली. ते म्हणाले, की ‘बेस्ट’च्या साडेचार हजार बसगाड्या आहेत. मात्र कोरोना संसर्गामुळे दोन हजार बसगाड्या चालायच्या. म्हणून मुंबई महापालिकेने एक हजार बसगाड्या महामंडळाकडून घेतल्या आहेत. आठ लाख किलोमीटरपेक्षा अधिक धावलेल्या बसगाड्या मुंबईसाठी चालत नाहीत. म्हणून नाशिकमधून नवीन १२० बसगाड्या पाठविण्यात आल्या आहेत. रेल्वे बंद असल्याने मुंबईत अत्यावश्‍यक सेवा, साहित्याच्या वाहतुकीसाठी बसगाड्या वापरण्यात आल्या आहेत. ठाणे, रायगड, पालघरमधील प्रवासी वाहतुकीची सेवा नाशिकने पुरविली आहे. 

८३५ बसगाड्या प्रवासी सेवेत उपलब्ध 

जिल्ह्यात अकराशे बसगाड्या प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होत्या. आयुर्मान कमी झालेल्या बसगाड्या सेवेतून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ८३५ बसगाड्या उपलब्ध आहेत. आयुर्मान कमी झालेली दोनशे वाहने ‘स्क्रॅप’ झाली होती. त्याचे स्टील, ॲल्युमिनिअम, टायर, चेसीस असे साहित्य विकले गेले. संपूर्ण राज्याप्रमाणे या साहित्याला नाशिकमध्ये मागणी चांगली राहिली. नाशिक विभागाला सहा कोटी ४४ लाख रुपये साहित्य विक्रीतून मिळाले आहेत. याशिवाय ५० ट्रक माल वाहतुकीतून पावणेदोन कोटींचे उत्पन्न मिळाले. दहा टन क्षमतेच्या मालवाहतुकीसाठी सुरवातीला ३५ रुपये प्रतिकिलोमीटर असे भाडे आकारले जात होते. आता ४४ रुपये भाडे आकारले जाते. सरकारच्या वाहतुकीचा व्यवसाय महामंडळाला मिळाला आहे. खराब झालेली मतदान यंत्रे तिरुपतीला पोचविण्यासाठी २० बसगाड्या देण्यात आल्या होत्या. आताच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ८० बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. बसगाड्या ‘ट्रॅकिंगॅ प्रणालीच्या सहाय्याने निवडणुकीचे साहित्य वेळेत पोचल्याचे निदर्शनास आल्याने निवडणूक निरीक्षकांनी महामंडळाच्या या प्रणालीचे कौतुक केले, असेही मैंद यांनी सांगितले. 

१६ युनिटमध्ये पाच हजार ७०० मनुष्यबळ 

एसटी महामंडळाच्या नाशिक विभागातील १६ युनिटमध्ये पाच हजार ७०० मनुष्यबळ आहे. कार्यशाळांमधून देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. इंजीन बनविणे, बसगाडी करणे, सुट्या भागाच्या सहाय्याने दुरुस्ती अशी कामे केली जातात. टायरचे ‘रिमोल्डिंग’ केले जाते. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात आणि आताही मोठ्या धैर्याने एसटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम केल्याने प्रवासी वाहतुकीचा प्रश्‍न निकाली निघू शकला आहे, असे मैंद यांनी अधोरेखित केले. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

शहर वाहतुकीसाठी ४० बसगाड्या 

नाशिक शहर वाहतुकीसाठी महामंडळाने ४० बसगाड्या दिल्या आहेत, असे सांगून मैंद म्हणाले, की महामंडळाच्या २१० बसगाड्या होत्या. त्यांपैकी आता १२० बसगाड्या शिल्लक आहेत. बरेच मार्ग मात्र बंद आहेत. सर्वाधिक प्रवासी वाहतूक मार्ग रुळावर येत असताना नवीन मार्गावर बसगाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे ५० हजार ते ६० हजार किलोमीटरने कमी झालेली वाहतूक हळूहळू वाढत आहे. मानव विकास योजनेसाठीच्या बसगाड्या सुरू झाल्या आहेत. याखेरीज शाळा-महाविद्यालये सुरू होताच, बसगाड्यांची संख्या वाढेल.  

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क