नाशिक : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) ज्येष्ठ नागरिक व इतर सवलतधारकांना स्मार्टकार्ड प्रदान केले जात आहेत. या कालावधीत प्रचलित पद्धतीनुसार ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार असल्याचे महामंडळाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
एसटीच्या स्मार्टकार्डसाठी मुदतवाढ
सध्या नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. ही गोष्ट लक्षात घेता शासनाकडून गर्दी कमी करण्याबाबत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या महामारीच्या काळात सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्या संबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने मुदतवाढीचा निर्णय घेत असल्याचे महामंडळातर्फे बुधवारी (ता.३१) जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. या योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली जात असून, ज्येष्ठ नागरिकांना या वाढीव मुदतीत स्मार्टकार्ड प्राप्त करून घेता येणार असल्याचे नमूद केले आहे.
हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड
१ ऑक्टोबरपासून प्रवासासाठी स्मार्टकार्ड बंधनकारक
१ ऑक्टोबरपासून प्रवासासाठी स्मार्टकार्ड बंधनकारक केले जाईल. तत्पूर्वी ३० सप्टेंबरपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी सध्याचे प्रचलित ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येऊन प्रवास करण्यास मुभा देण्यात यावी, असे स्पष्ट केले आहे. विविध विभाग नियंत्रक, आगारप्रमुखांनी यासंदर्भात वाहकांना सूचना देण्याचे या परिपत्रकाद्वारे सुचविले आहे.
हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण
३० सप्टेंबरपर्यंत स्मार्टकार्ड मुदत
ज्येष्ठ नारिकांना स्मार्टकार्ड प्राप्त करून घेण्यासाठी बुधवार (ता.३१)पर्यंत मुदत संपत असताना मुदतवाढीचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आता ३० सप्टेंबरपर्यंत स्मार्टकार्ड प्राप्त करून घेता येणार आहे.