एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा

एसटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सुटीच्या कालावधीत हंगामी तिकीट दरवाढ करण्यात आली होती. दिवाळीच्या सुट्या संपल्यामुळे मंगळवार (दि. 1) पासून ही हंगामी दरवाढ रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार प्रवास करता येणार आहे. हंगामी दरवाढ मागे घेतल्याने एसटीने नियमित प्रवास करणार्‍या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्या, सप्ताहअखेर अशा गर्दीच्या काळात महसूलवाढीचा स्रोत म्हणून 30 टक्क्यांपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत. त्यानुसार 21 ते 31 ऑक्टोबर या दिवाळी सुटीच्या कालावधीत सर्व बससेवा प्रकारांसाठी 10 ते 15 टक्क्यांपर्यंत तिकीट दरवाढ करून अतिरिक्त महसूल मिळविण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात आला होता. दिवाळीचा हंगाम संपल्याने अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रादुर्भावानंतर यंदा प्रथमच दिवाळी सुट्यांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले होते. प्रवाशांनी मूळगावी जाण्यासह पर्यटनस्थळाच्या भेटीसाठी लालपरीला पसंती दिल्याचे चित्र होते. त्यामुळे हंगामी दरवाढ असतानाही एसटी बसेस पूर्ण क्षमतेने धावत होत्या. त्यातूनच एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाल्याचा अंदाज वरिष्ठ अधिकार्‍यांनी वर्तविला आहे.

हेही वाचा :

The post एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा appeared first on पुढारी.