ऐकावे ते नवलच! चक्क चारचाकी वाहनातून बोकडचोरी; नाकाबंदी करून मुंबईच्या दोघांना बेड्या 

लासलगाव (जि.नाशिक) : आजकाल कशाचाच नेम राहिलेला नाही, कधी, कुठे कोणी काय करेल हे सांगणे कठीण झाले आहे. येथे चक्क चारचाकी वाहनातून बोकड चोरी करणाऱ्या मुंबईच्या दोघा चोरट्यांना लासलगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याची घटना घडली.

नेमके काय घडले?

येथील सर्व्हे क्रमांक ९३ मधील रहिवासी उस्मान गणी मेहमूदखा पठाण (वय ७२) यांच्या घरासमोरून बोकड चोरून नेल्याची घटना बुधवारी (ता. १०) घडली होती. विशेष म्हणजे चोरटे काळ्या रंगाच्या ॲसेंट कार (एमएच ०३, एएम १३२१)मधून आले होते.

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

नाकाबंदी करुन पकडले बोकडचोर

फिर्यादीने या घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना देताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देवीदास लाड, संतोष इप्पर, सागर आरोटे यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. निफाड पोलिसांना याबाबत घटनेची माहिती दिल्यानंतर हवालदार ज्ञानेश्‍वर सानप, भारत पगार, विलास बिडगर आदींनी नाकाबंदी करीत वाहनचालक सलीम बाबू शेख, सोहेल जब्बार कुरेशी (दोघे रा. मुंबई) यांना बोकडासह ताब्यात घेतले. या चोरट्यांना  न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देवीदास लाड तपास करीत आहेत.  

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी