ऐतिहासिक गोंदेश्‍वर मंदिरासाठी अर्थसंकल्पात तरतूद; ४० ते ५० कोटी निधी मिळणे अपेक्षित 

सिन्नर (जि. नाशिक) : स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या सिन्नर येथील हेमाडपंथी गोंदेश्‍वर मंदिरासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. सोमवारी (ता. ८) सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील आठ वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांचा विकास करण्यासाठी १०१ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. त्यात सिन्नरच्या गोंदेश्‍वर मंदिराचा समावेश असल्याने ही बाब सिन्नरकरांसाठी आनंदाची ठरली आहे. 

आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नांना यश

२००९ ते २०१४ दरम्यान विधानसभा सदस्य असताना आमदार माणिकराव कोकाटे यांनी पर्यटनस्थळ म्हणून गोंदेश्‍वर मंदिराच्या विकासाचे काम हाती घेतले होते. मात्र, मधल्या काळात हे काम रखडले होते. चौथ्या खेपेला आमदारकीची सूत्रे स्वीकारल्यावर मंदिर सुशोभीकरणाचे काम पुन्हा सुरू करून ऐतिहासिक गोंदेश्‍वरला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याबरोबरच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सिन्नरचा नावलौकिक वाढावा, यासाठी कोकाटे यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यास यश आले असून, गोंदेश्‍वरसह राज्यातील आठ प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांचा विकास करण्यासाठी १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

मुसळगाव शिवारात शिर्डी महामार्गलगत उभे राहणारे क्रीडासंकुल आणि ऐतिहासिक गोंदेश्‍वर मंदिराचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास करणे हे आगामी काळात महत्त्वाचे प्रकल्प आहेत. क्रीडा संकुलासाठी १७६ कोटी इतका खर्च अपेक्षित असून, गोंदेश्‍वर मंदिर सुशोभिकरणासाठी ४० ते ५० कोटी मिळणे अपेक्षित आहे. त्यातून मंदिर परिसरात सुविधा निर्माण होवून सिन्नरच्या वैभवात भर पडेल. 
- माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर 

सावलीच्या छटांतून मंदिर उठावदार... 

१२ व्या शतकात उभारणी केलेल्या गोंदेश्‍वर मंदिराचा समावेश केंद्र सरकारने महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून केला आहे. शैवपंचायतन प्रकारातील हे मंदिर असून, मध्यावर गोंदेश्‍वराचे मुख्य शिवमंदिर आणि सभोवतालच्या चार उपदिशांना पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची मंदिरे आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून, त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिर अधिक उठावदार दिसते. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO