ऐनवेळच्या घूमजावमुळे त्र्यंबकेश्‍वरच्या रथोत्सवाची तयारी पाण्यात; नागरिकांचा हिरमोड

त्र्यंबकेश्‍वर (नाशिक) : आठवड्यापासून मोठ्या धूमधडाक्यात त्र्यंबकेश्‍वरला रथोत्सवाची तयारी सुरू होती. पालिकेने खड्डे बुजविले, पोलिसांच्या बंदोबस्तांची पाहणी झाली. रथाला रंगरंगोटी, रोषणाईचे नियोजन होऊन रथ रस्त्यावर आला आणि ऐनवेळी प्रांताधिकाऱ्यांनी रथोत्सवाला परवानगी देता येणार नसल्याचे पत्र देऊन त्र्यंबकेश्‍वरच्या नागरिकांचा हिरमोड केला. त्यामुळे परवानगी द्यायची नव्हती, तर तयारी तरी कशाला करायला लावली? अशी भावना व्यक्त होत आहे. 

परवानगी द्यायची नव्हती, तर तयारी तरी कशाला करायला लावली?

त्र्यंबकेश्‍वरला एका बाजूला रथोत्सवाची प्रशासकीय यंत्रणेकडून जोरदार तयारी सुरू असताना, प्रांताधिकाऱ्यांनी रात्री उशिरा रथोत्सवाला परवानगी नसल्याचे स्पष्ट करीत परवानगी नाकारली. १५ दिवसांपासून येथे जोरदार तयारी सुरू होती. प्रांत तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, पोलिस उपविभागीय अधिकारी ढोले, मुख्याधिकारी संजय जाधव, विश्वस्त प्रशांत गायधनी, संतोष कदम, सत्यप्रिय शुक्ल, तृप्ती धारणे, ॲड. पंकज भुतडा, दिलीप तुंगार यांच्यासह पालिका कर्मचारी आदींनी आढावा घेऊन तयारीवर समाधान व्यक्त केले होते. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

...अन् माशी शिंकली 
रथोत्सवाचा सजवलेला रथ रस्त्यावर आला असताना त्र्यंबकेश्‍वर देवस्थानने प्रेस नोट काढून नियम व व्यवस्था या बाबतीत सर्व प्रसारमाध्यमांनी बातमी दिली. हे सगळे महसूल, पोलिस देवस्थान आणि स्थानिक पालिकेच्या नियोजनानुसार घडत असताना, रात्री आठच्या सुमारास अचानक माशी शिंकली आणि सगळ्या तयारीवर पाणी फिरले. अचानक प्रांत तेजस चव्हाण यांनी कोविडचे कारण व गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून परवानगी नाकारल्याचे पत्र देवस्थानला दिले. त्यामुळे परवानगीच द्यायचीच नव्हती, तर मग प्रशासकीय यंत्रणांना रथोत्सवाची तयारी कशाला करायला लावली, अशी सामान्यांची भावना आहे. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ
रथोत्सवाची परंपरा 
त्र्यंबकेश्वर नगरीचा आनंदोत्सव म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा होय. भगवान शिवशंकराने वध कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरासुर राक्षसाचा वध केल्याबद्दल विजय उत्सव म्हणूनही साजरा होतो. पेशव्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर सरदार विंचूरकर यांनी ३ नोव्हेंबर १८६५ ला शिसवी लाकडाचा ३१ फूट उंचीचा रथ श्री त्र्यंबकेश्‍वराला अर्पण केला. जयपूर येथील माणिकचंद राजपूत यांनी हा रथ तयार केला असून, त्या काळात १२ हजार रुपये खर्च तयार झाला आहे. रथाच्या कळसाच्या खाली नवग्रह मूर्ती कोरल्या असून, चारही दिशांना सिंह आहेत. तीन दिवस चालणाऱ्या उत्सवात पहिला दिवस वैकुंठ चतुर्दशीला रात्री विशेष पूजा व हरिहर भेट होते. सप्त धान्यपूजा व मंदिरात पालखी काढली जाते. पौर्णिमेस सकाळी रथाची व नवग्रह पूजा, दुपारी चारला सजविलेल्या रथात ‘श्रीं’चा पंचमुखी सुवर्ण मुखवटा ठेवून रथयात्रा सुरू होते. 

- रंगरंगोटी, सजावट होऊन रथ रस्त्यावर 
- पालिकेन उत्सवासाठी खड्डे बुजविले 
- पोलिस पाहणी बंदोबस्ताचा आढावा झाला 
- रात्री आठला देवस्थानमध्ये पत्र धडकले