ऑक्सिजनच्या एका खाटेमागे अडीच रुग्णांचे ‘वेटिंग’! जिल्ह्याची अवस्था बिकट  

नाशिक : कोरोना चाचण्यांमध्ये फेब्रुवारीमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचा दर २३ ते २५ टक्क्यांपर्यंत होता. तो आता दिवसाला ४९ टक्क्यांच्याही पुढे भिडला आहे. म्हणजेच, काय तर रुग्णांचे प्रमाण दुपटीने वाढत असताना त्या तुलनेत आरोग्य सुविधांची व्यवस्था उपलब्ध नसल्याने ऑक्सिजनच्या एका खाटेमागे ‘वेटिंग’ अडीच रुग्णांपर्यंत पोचले आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत उपलब्ध सुविधांचा विचार करता, नाशिकपाठोपाठ देवळा, नांदगाव, निफाड, बागलाण, सिन्नर, मालेगाव, येवला, कळवण तालुक्यांची म्हणजेच, ६० टक्के जिल्ह्याची अवस्था बिकट बनली आहे. 

दिवसाचा पॉझिटिव्हिटी दर ४९ टक्क्यांच्या पुढे
कागदोपत्री उपलब्ध व्यवस्था ठीक दिसते खरे. त्यामुळे आरोग्य सुविधांमध्ये वाढ करायला हवी म्हटल्यावर कुणीही ऐकून घेत नसल्याचे गाऱ्हाणे आरोग्य यंत्रणेतून मांडले जात आहे. मुळातच, व्हेंटिलेटर मोकळे दिसत असले, तरीही त्याचा खाटा उपलब्ध नसल्याने वापर करणे शक्य होत नाही, हे का समजून घेतले जात नाही, हा खरा प्रश्‍न आहे. गेल्या वर्षीच्या संसर्गावेळी आपत्ती नवीन असल्याने खासगी रुग्णालये बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे स्वाभाविकच कोरोनाग्रस्त आणि इतर आजारांचा ताण सार्वजनिक आरोग्यसेवेवर आला होता. आता तशी परिस्थिती नाही. तरीही सुविधा अपुऱ्या का पडत आहेत, याचा ‘ग्राउंड रिपोर्ट’ का घेतला जात नाही, याचे कोडे नाशिककरांना उलगडत नाही.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

६० टक्के जिल्ह्याची अवस्था बिकट 

रुग्णसंख्या दुपटीने वाढत असताना सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील ऑक्सिजन, व्हेंटिलेटरप्रमाणेच खाटांच्या उपलब्धतेचे प्रमाण दुप्पट करण्यासाठी नेमका कोणता मुहूर्त शोधला जात आहे, असा प्रश्‍न आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांना पडला आहे. उपाययोजनांचा एक भाग म्हणून एका तालुक्यात दोन ते तीन ग्रामीण रुग्णालये असलेल्या ठिकाणी अशी रुग्णालये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर सुविधा कधी वापरली जाणार, हा खरा प्रश्‍न आहे. 

खाटा वाढणार कधी? 
ग्रामीणचा ताण जिल्हा सरकारी रुग्णालयावर वाढत आहे. या रुग्णालयात कोरोनाग्रस्त प्रसूतीसाठी दहा आणि इतर कोरोना रुग्णांसाठी १०० अशा ११० खाटांची व्यवस्था आहे. याच रुग्णालयात अनेक व्हेंटिलेटर वापराविना आहेत. त्यामागचे कारण शोधले असता, व्हेंटिलेटरसाठी खाटा उपलब्ध नाहीत, असे गंभीर कारण पुढे आले. अशा वेळी रुग्णालयातील इतर ५४१ खाटांपैकी काही खाटा कोरोना रुग्णांच्या शुश्रूषेसाठी वापरणे शक्य होईल काय, याचा विचार होणे अपेक्षित आहे. त्यासाठी अर्थात, कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांच्या शुश्रूषेची व्यवस्था स्थानिक पातळीवर करण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. त्याच वेळी डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोरोना रुग्णालयातील खाटांमधील अंतर कमी करत खाटा वाढविणे शक्य आहे, याची पडताळणी आता काळाची गरज मानली जात आहे. २५ जिल्ह्यांतील डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटरमध्ये ७७५ खाटा उपलब्ध आहेत. अशा भागात ५०१ पॉझिटिव्ह, ९४ संशयित असे एकूण ५९५ रुग्ण आहेत. ३३६ जणांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे. शिवाय अजूनही ५३२ स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत. प्रलंबित स्वॅबमध्ये सिन्नरचे ४७, कळवणचे ५७, नाशिक ग्रामीणचे ३३१, चांदवडचे ७०, नांदगावचे १५ स्वॅब आहेत. ही सारी परिस्थिती पाहता, ग्रामीण आरोग्यव्यवस्था किती खोल गर्तेत रुतली आहे, यासाठी निराळ्या अभ्यासाची आवश्‍यकता राहिलेली नाही. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

पोर्टेबल सिलिंडर वापरणे शक्य 
कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेत पहिल्यांदा रुग्ण कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल व्हायचे. त्यानंतर आवश्‍यकतेनुसार त्यांना डेडिकेटेड कोरोना केअर सेंटर अथवा डेडिकेटेड कोरोना रुग्णालयात दाखल केले जायचे. आताची परिस्थिती नेमकी उलटी झाली आहे. संदर्भ सेवेसाठीची सुविधा एव्हाना ‘फुल’ झाल्याचे आरोग्य यंत्रणेच्या आकडेवारीवरून दिसून येते. जिल्ह्यातील २६ कोरोना केअर सेंटरमध्ये एक हजार ९४० खाटा उपलब्ध आहेत. त्याच्या कार्यक्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५४ इतकी असून, संशयित २४ असे एकूण ३७८ आहेत. शिवाय एक हजार ३८५ स्वॅब प्रलंबित आहेत. त्यात दिंडोरीच्या ७२, सटाण्याच्या १३८, कळवणच्या ३४८, सिन्नरच्या १०४, पेठच्या ८२, सुरगाण्याच्या १९, त्र्यंबकेश्‍वरच्या ८५, निफाडच्या १७१, देवळ्याच्या ३६५ स्वॅबचा समावेश आहे. या साऱ्या परिस्थितीत कोरोना केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करून देणे शक्य आहे काय, अशी विचारणा केल्यावर आरोग्य यंत्रणेतील अभ्यासकांनी अशा ठिकाणी पोर्टेबल सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सिजनची सेवा उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे नमूद केले. मग प्रश्‍न तयार झाला तो म्हणजे, खाटा-ऑक्सिजन उपलब्ध झाल्यावर मनुष्यबळाचे काय करायचे? त्यावरही अभ्यासकांनी तोडगा सांगितला आहे. तो म्हणजे, कोरोनाव्यतिरिक्त उपचार व्यवस्थेत असलेल्यांच्या सेवा अशा ठिकाणी घेणे शक्य आहे. मात्र सगळ्याच प्रश्‍नांची उकल करण्यासाठी जिल्हास्तरावरून धोरणात्मक निर्णय घेण्याची तसदी घेण्याची आवश्‍यकता निर्माण झालेली दिसते. 

नाशिकमध्ये खाटेमागे ‘वेटिंग’ दोन ते तीन 

नाशिक : शहरात मार्चमध्ये रुग्णांची संख्या तीस हजारांपुढे गेल्याने खासगी रुग्णालयांमध्ये एका खाटेमागे दोन ते तीन रुग्णांचे ‘वेटिंग’ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यातही ऑक्सिजन, व्हेंटिलेटर खाटांना अधिक मागणी असल्याने, खाटा उपलब्ध करून देण्याबरोबरच ऑक्सिजनची उपलब्धता व वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून देताना रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडत आहे. 

खाटांची टंचाई निर्माण
फेब्रुवारीमध्ये कोरोना संसर्गाचा विस्फोट झाल्यानंतर महापालिकेच्या स्वमालकीच्या रुग्णालयांसह खासगी ११९ रुग्णालयांमध्ये ८० टक्के खाटा कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले. शहरात एकूण चार हजार ४२६ खाटा उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. महापालिकेच्या कोरोना ‘डॅशबोर्ड’वर रिक्त खाटांची माहिती दर्शविण्यात आली आहे. एकूण खाटांपैकी सर्वसाधारण एक हजार ४६२, ऑक्सिजनच्या एक हजार ९२२, आयसीयू ६३६, व्हेंटिलेटरच्या ४३३ आहेत, तर एक हजार ९२५ खाटा रिक्त दर्शविल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात खाटांच्या बाबतीत भयावह परिस्थिती आहे. बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये भरती होत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये मात्र खाटांची टंचाई निर्माण झाली आहे. सर्वसाधारण खाटांपेक्षा ऑक्सिजन, व्हेंटिलेटर खाटांना अधिक मागणी आहे. या खाटांवर मधुमेह, रक्तदाबाच्या रुग्णांकडून अधिक मागणी होत आहे. शंभर खाटांपर्यंत संख्या असलेल्या रुग्णालयांमधील खाटा ‘फुल’ झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून केला जात आहे. वीस, तीस, चाळीस खाटा संख्या असलेल्या रुग्णालयांमधील खाटा ‘फुल’ झाल्या आहेत. 

कोरोना ‘डॅशबोर्ड’वर अपुरी माहिती 
महापालिका प्रशासनाकडून उपलब्ध खाटांची संख्या दर्शविली जात आहे. मात्र, महापालिकेच्या डॅशबोर्डची ‘की’ कोरोना रुग्णालयांकडे असल्याने रिक्त खाटांची संख्या दर्शविण्याची जबाबदारी त्या-त्या रुग्णालयावर सोपविण्यात आली आहे. रुग्णालयांमधील खाटा ‘फुल’ असतील, तर ‘डॅशबोर्ड’वर रिक्त खाटांची दर्शविली जाणारी संख्या, रुग्ण व त्यांच्या नातवाइकांचा अंत पाहणारी ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया शहरवासीयांची आहे. 

२३५ नवीन ऑक्सिजन खाटा 
महापालिका प्रशासनाकडून सोमवारी पुन्हा नव्याने २३५ नवीन ऑक्सिजन खाटांची व्यवस्था झाल्याची घोषणा करण्यात आली. महापालिकेच्या ‘डॅशबोर्ड’वर रिक्त खाटा असल्याचे दर्शविले जात असेल, तर नव्याने ऑक्सिजन खाटांची आवश्‍यकता का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. समाजकल्याण कोरोना सेंटरमध्ये चारशे सर्वसाधारण खाटा आहेत. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात १५९ ऑक्सिजन खाटा आहेत. नवीन बिटको रुग्णालयात ४६० ऑक्सिजन खाटा असून, २०५ सर्वसाधारण खाटा आहेत. ऑक्सिजन खाटांची संख्या एक हजारापर्यंत वाढविली जाणार असून, सध्या एकूण ७३९ ऑक्सिजन खाटांची व्यवस्था झाल्याचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले. 

नाशिक शहर-जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी 
(१ ते २८ मार्च २०२१ पर्यंतचे आकडे टक्केवारीमध्ये) 
दिवस नाशिक महापालिका नाशिक ग्रामीण मालेगाव महापालिका 

१ मार्च १९.०९ १९.५१ २०.३४ 
२ मार्च १६.१८ १८.७५ ६० 
३ मार्च २१.२४ १६.७३ ३८.२२ 
४ मार्च १६.३४ २३.६६ १२.६७ 
५ मार्च २९.६४ १६.३९ ३२.२१ 
६ मार्च १८.३४ २३.८ ३५.६२ 
७ मार्च २५.९९ २९.१७ २३.७९ 
८ मार्च ३७.१ १४.७३ ४४.७२ 
९ मार्च ४२.८१ ३१.९८ ६३.०८ 
१० मार्च ३२.२८ ३५.६४ ५३.२८ 
११ मार्च ३७.८ ३७.७९ ४२.४ 
१२ मार्च २८.५५ ३४.४७ ४५.८३ 
१३ मार्च ४३.३२ ४४.९८ ६६.१९ 
१४ मार्च ४३.८८ २७.२३ ५३.१६ 
१५ मार्च ४४.१७ ४१.९२ ६९.६३ 
१६ मार्च ४४.७६ ३३.७८ ५८.५४ 
१७ मार्च ३२.८६ २६.५८ ६०.८४ 
१८ मार्च २७.३८ २५.०१ ४८.९४ 
१९ मार्च ३१.०८ २५.९३ ६५.७ 
२० मार्च ३६.६६ ३४.२८ २३.७८ 
२१ मार्च २९.६४ २३.४१ ३७.१ 
२२ मार्च ३०.२३ ४९.५५ ५२.२८ 
२३ मार्च २९.३८ १८.३७ ५५.४६ 
२४ मार्च २८.४६ ३२.६७ ४८.१३ 
२५ मार्च २५.०५ ३०.५३ १०.८८ 
२६ मार्च २८.१३ २३.९४ ४९.२५ 
२७ मार्च २६.८३ २५.५७ ३५.३१ 
२८ मार्च ३९.१४ ३२.७४ २८.२२