ऑक्सिजन पुरवठ्याची बोंबाबोंब! डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय; काम अजूनही अपूर्णच 

नाशिक : कोविड रुग्णांसाठी जीवदान ठरणारे डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय ऑक्सिजन पुरवठा आणि कर्मचारी संख्येच्या अभावामुळे नेहमी चर्चेत राहिले आहे. आज देखील कर्मचाऱ्यांचा अभाव तर आहेच शिवाय ऑक्सिजन पुरवठ्याची बोंबाबोंब होत आहे. अशी माहिती रुग्णांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली. 

ऑक्सिजन पुरवठ्याची बोंबाबोंब

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात सध्या १२६ रुग्ण उपचार घेत आहे. त्यातील ८८ रुग्ण ऑक्सिजन यंत्रणेवर तर १३ रुग्ण अतिशय गंभीर असल्याने त्यांच्यावर व्हॅन्टीलेटरच्या माध्यमातून उपचार सुरु आहे. रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना उपलब्ध सुविधांचा वापर करत रुग्णांवर उपचार करत आहे. दुसरीकडे महापालिका वैद्यकीय यंत्रणेला मात्र गांभीर्य कमी वाटत असल्याचा अनुभवही रुग्णांना येत आहे. गेल्यावर्षी अनेक रुग्णांना ऑक्सिजन आवश्‍यकता भासली. रुग्णालयाच्या कमी क्षमतेच्या ऑक्सिजन यंत्रणेवर मोठा ताण पडला.

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

वैद्यकीय यंत्रणा खडबडून जागी

महापालिकेकडून येथे अतिरिक्त ऑक्सिजन साठ्याची यंत्रणा उभारणीचा विचार केला. त्याचे कामही सुरु झाले. त्यानंतर रुग्णांची संख्या घटली. सर्वत्र अनलॉक झाले. त्यामुळे येथील वैद्यकीय यंत्रणा देखील काहीअंशी बिनधास्त झाली. त्याचे उदाहरण म्हणजे रुग्णालयात अतिरिक्त ऑक्सिजन टॅंक बसविण्याचे काम काही दिवस संतगती तर नंतर एकदमच बंद झाले. आठ दिवसात यंत्रणा सुरु होईल, असे उत्तर अनेक मिळत राहिले. काही दिवसापासून मात्र पुन्हा कोरोना उद्रेक झाल्याने वैद्यकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यांनी पुन्हा एकदा ऑक्सिजन टॅंक बसविण्याचे काम हाती घेतले. सुमारे १३ हजार लिटर क्षमतेची टॅंक बसविली.

टॅंक केवळ शोभेची वस्तू

सध्या टॅंक केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. कारण पाइप लाईनसह अन्य काही यंत्रणेचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे आजही जुन्या लहान क्षमतेच्या टॅंकच्या माध्यमातूनच ऑक्सिजन पुरवठा होत आहे. परंतु, तो अपुरा ठरत आहे. टॅंक लहान असल्याने लवकर संपते. ते बदलण्यामध्ये कमीत कमी १० ते १५ मिनिटे लागतात. अशा वेळेस ऑक्सिजन पुरवठा बंद होण्याच्या घटना घडत असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले. 

हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

ऑक्सिजन टॅंक बसविण्यात आली आहे. सोमवारी (ता.२२) इंजिनिअर यांनी पाहणी केली. उर्वरित काम येत्या आठ दिवसात पूर्ण होणार असल्याने या आठवड्यात नवीन ऑक्सिजन प्रणाली सुरु होणार आहे. - डॉ. नितीन रावते, वैद्यकीय अधिकारी. 

रुग्णांचे अहवाल येण्यास जास्त दिवस लागत आहे. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. -  झुबेर हाश्‍मी, जिल्हा रुग्णालय कल्याण समिती सदस्य