ऑनलाइन गेम ठरतायत विद्यार्थ्यांच्या भविष्याला घातक! मानसिक गुंता सोडविण्यासाठी तज्ज्ञांकडे गर्दी 

नाशिक : ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना थेट मोबाईल वापरण्याची संधी मिळाल्याने अभ्यासक्रम शिकविणे सुटसुटीत झाले असले, तरी दुसरीकडे अभ्यासाबरोबरच ऑनलाइन गेम खेळण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. यातून असंख्य विद्यार्थ्यी गेमच्या आहारी गेल्याने आता त्यांना यातून बाहेर पडणे मुश्‍कील झाले असून, या मानसिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची गरज भासू लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

ऑनलाइन गेम ठरतायत विद्यार्थ्यांच्या भविष्याला घातक 
नाशिकमधील काही पालक, प्राध्यापक व मानसोपचारांच्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने सर्वाधिक फटका शैक्षणिक क्षेत्राला बसला. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना येण्यास बंदी असल्याने सर्वच शाळांनी गेल्या वर्षी आठ ते दहा महिने ऑनलाइन अभ्यासक्रमावर भर दिला. त्यापूर्वी मोबाईल वापरावर पालकांकडून बंधने होती. लॉकडाउनमुळे थेट मोबाईल ॲक्सेसबरोबरच नेटवर्कदेखील वापरण्यास मिळाल्याने विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने मोबाईल क्रांती ठरली खरी मात्र त्यातून मानसिक समस्या निर्माण झाल्या आहेत.

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

मानसिक गुंता सोडविण्यासाठी तज्ज्ञांकडे गर्दी 

ऑनलाइन अभ्यासक्रमाचे दोन ते तीन तास वगळता विद्यार्थ्यांकडून मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळण्याचे प्रकार वाढले. ग्रुप करून गेम खेळले जाऊ लागल्याने काही गेम घरात खेळता येत नसल्याने सायबर कॅफेमध्ये जाऊन गेम खेळण्याची तहान भागविली जाऊ लागली. कॉलेज रोड, शरणपूर रोड भागातील गेम झोन, तसेच सायबर कॅफेमध्ये गेम खेळणाऱ्यांची गर्दी वाढली. परंतु, या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्यदेखील बिघडले. अनेक विद्यार्थ्यांना आता यातून बाहेर पडणे मुश्कील झाल्याची बाब पालकांकडे बोलून दाखविण्यात आली. काही विद्यार्थ्यांचे लिखाण व वाचनाची सवय मोडल्याने स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडे धाव घेतली जात आहे. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट

हे आहेत परिणाम 
-विद्यार्थ्यांची एकाग्रता नाहीशी 
-आभासी जगात वापरण्याची सवय 
-भविष्यात असुरक्षिततेची भावना 
-शारीरिक व्यायाम बंद होऊन आजारांना निमंत्रण 
-चिडचिडेपणा, एकलकोंडेपणात वाढ 
-समाजविघातक कृत्याची शक्यता 
-फसवणुकीची शक्यता 

-विद्यार्थ्यांना खोलीत एकटे ठेवू नये. 
-गेमच्या आहारी गेल्यास समुपदेशन करावे. 
-रागावणे, मारहाण करण्यापेक्षा समजावून सांगावे. 
-जबाबदारीची जाणीव करून देणे. 
-पाल्यांच्या वेळेचे नियोजन करून वेळापत्रक तयार करावे. 

ऑनलाइन गेमला व्यसनाचे स्वरूप आल्याने विद्यार्थी त्यात अडकत चालले आहेत. यातून बाहेर पडणे अवघड होत असल्याने पालकांसमोर मोठी समस्या आहे. चांगल्या-वाईटाचा विचार करण्याची मेंदूची क्षमता शालेय वयात विकसित झालेली नसल्याने अडचण निर्माण होत आहे. 
-डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचारतज्ज्ञ 
----कोट------- 
(फोटो- F83151) 
मोबाईल स्क्रीनवर ऑनलाइन अभ्यासक्रम होत असताना गेमची एक विंडोदेखील ओपन असते. अभ्यासापेक्षा गेम खेळण्याकडे विद्यार्थी अधिक लक्ष देतात. वेळेअभावी पालक पूर्ण लक्ष देऊ शकत नाही. सध्या हा ज्वलंत प्रश्‍न निर्माण झाला असून, पालकांसह शिक्षकांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. 
-प्रा. डॉ. वीणा नारे-ठाकरे, पालक