ऑनलाइन नायझेरियन फ्रॉडचा भांडाफोड; नाशिक पोलिसांनी दिल्लीत आवळल्या संशयिताच्या मुसक्या

नाशिक : डेटींग ॲपवरुन महिलेसोबत झालेली ओळख शहरातील  ४० वर्षीय व्यापाऱ्याला चांगलीच महागात पडली. ऑनलाईन झालेल्या ओळखीतून व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करत नाशिकच्या व्यापाऱ्याची सुमारे २० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.  वाचा नेमके काय घडले

टुली मॅडल वर झाली ओळख

शहरातील ४० वर्षीय व्यापाऱ्याने ट्रुली मॅडली नावाच्या डेटींग ॲपवरुन मोनिका सिंग या महिलेसोबत ओळख केली. या महिलेने व्यापाऱ्यासोबत फक्त व्हॉट्सअपवरुन चॅटींग करुन ओळख वाढवली. तसेच ती स्वत: नेदरलँड येथील ॲमस्टरडॅम येथे राहत असून बोरटॅड फार्मासिटीकल कंपनीत नोकरीस असल्याचे भासवले. व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केल्यानंतर संशयिताने आमच्या कंपनीस औषध बनवण्यासाठी तेल लागत असून ते दक्षीण भारतात मिळते असे सांगितले.

१९ लाख ६० हजार रुपये भरले

व्यापाऱ्यास कर्नाटक राज्यातील बिदर येथील राजेश नंदी याच्याशी संपर्क साधून सहा लिटर तेल कुरीअर मार्फत मागवण्यास सांगितले. तसेच हे तेल बेंगलोर येथून तपासण्याचा बहाणा केला. त्यानंतर या महिलेने व्यापाऱ्यास पुन्हा २०० लिटर तेल घेण्यास सांगून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात १९ लाख ६० हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार व्यापाऱ्याने ते पैसे भरले. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

असा लागला तपास

मात्र त्यानंतर संपर्क न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्याने २० नोव्हेंबरला सायबर पोलिसांकडे तक्रार केली. सायबर पोलिसांनी पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून दिल्ली येथे सापळा रचला. आरोपी हे दररोज बँक खात्यातून पैसे काढत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी दिल्लीतील उत्तम नगर येथील बँकामध्ये पाळत ठेवली. संशयितांनी पैसे काढताच पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यातील एकाचे नाव व्हिक्टर डॉमिनिक ओकॉन (४२, रा. नवी दिल्ली) आणि पवनकुमार हरकेश बैरवा (२४, रा. राजस्थान, सध्या रा. दिल्ली) असे सांगितले. पोलिसांनी दोघांचाही ताबा घेत त्यांना नाशिकला आणले.

दहा बँक खाती सील

त्यांच्याकडील चौकशीतून त्यांचे इतरही साथिदार असल्याचे लक्षात आले आहे. या संशयितांची दहा बँक खाती सील केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त संग्रामसिंह निशानदार यांनी सांगितले. उर्वरीत संशयितांना अटक करण्यासाठी सायबर पोलिसांचे आणखी एक पथक दिल्ली येथे पाठवण्यात येणार आहे. संशयितांनी स्वत:च्या नावे बँक खाती तयार केली असून त्यामार्फत ते फसवणूकीचे पैसे काढत असल्याने त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करणार असल्याचे निशानदार यांनी सांगितले. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

नागरिकांनी डेटींग ॲपचा वापर सावधगिरीने करावा. सोशल मीडियावरुन अनोळखी व्यक्तींसोबत कोणताही आर्थिक व्यवहार किंवा व्यवसाय करु नये. या गुन्ह्यात इतर संशयितांचाही सहभाग असून त्यांना पकडण्यात येईल. तसेच या संशयितांनी इतर नागरिकांची फसवणूक केली आहे का याचाही तपास केला जात आहे. 
-संग्रामसिंह निशानदार, (पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा नाशिक)