ऑनलाइन मुद्रांक शुल्क भरल्यास मिळेल सुटीचा लाभ ; कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मालमत्तांची दस्त नोंदणी करताना शासनाने ३ टक्के सवलत दिली होती. ३१ मार्चला मुदत संपत असल्याने मोठ्या प्रमाणात सहनिबंधक कार्यालयांमध्ये गर्दी होत असल्याने जिल्हा सहनिबंधक कार्यालयाने ऑनलाइन मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिने म्हणजे जुलै २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क सुटीचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. 

गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आला. या काळात मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यवसाय ठप्प होण्याबरोबरच दस्तांची नोंदणी रखडली होती. दस्त नोंदणीतून राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. त्यामुळे दस्त नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले होते. दस्त नोंदणी करताना नियमित ६ टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाते. शासनाने ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत दिल्याने त्याचा लाभ हजारो दस्त नोंदणीत होऊन शासनाला महसूल मिळाला होता. जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत सवलतीत १ टक्का कपात करताना २ टक्क्यांपर्यंत लाभ दिला जात आहे; परंतु आता ३१ मार्च २०२१ ला सवलतीची मुदत संपुष्टात येत असल्याने सहनिबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणीसाठी गर्दी होत आहे; परंतु सध्या कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने निर्बंध आणले जात आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिन्यांत म्हणजे जुलै २०२१ पर्यंत दस्त नोंदणीधारकांना लाभ मिळणार असल्याचे जिल्हा सहनिबंधक कैलास दवंगे यांनी माहिती दिली. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ