ऑनलाइन शिक्षण पद्धतीने मुलांच्या वागणुकीत बदल; पालक, शिक्षकांसमोर आव्हान  

कंधाणे (जि.नाशिक) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीपासूनच शाळा बंद आहेत. शिक्षण विभागाकडून ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. ऑनलाइन शिक्षणात मोबाईलच्या अतिरेकी वापराने मुलांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम होत आहेत. दैनंदिन जीवनशैलीत व वागणुकीत बदल होत असून, भविष्यात कोविडनंतर शाळेतील ऑफलाइन शिक्षणाच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचे आवाहन विद्यार्थी, पालक व शिक्षकांसमोर उभे राहणार आहे. 

परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी पालक, शिक्षकांसमोर आव्हान 
विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवू नये म्हणून शाळा प्रशासन, शिक्षकांनी इंटरनेट, वाय-फाय सिस्टिम, लॅपटॉप, कॉम्प्युटर अशा आवश्यक विविध साधनांची पायाभूत सुविधा उपलब्ध करून गुगल मीट, क्लासरूम, झूम किंवा दीक्षा ॲपद्वारे विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. त्यासाठी सुशिक्षित व सधन पालकांना मुलांच्या हाती मोबाईल द्यावा लागला. आधीच मोबाईलचे आकर्षण असलेली मुले अभ्यासाव्यतिरिक्त तासन् तास मोबाईलवर कानाला हेडफोन लावून गाणी ऐकणे, गेम खेळणे, यू-ट्यूबवर कार्टून, विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यात मग्न झाली. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांना निद्रानाश, बोटे, हात, पाठ, मान व कानाच्या पडद्याच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना ग्रामीण व आदिवासी दुर्गम भागात नेटवर्क किंवा शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील पालकांकडे अँड्राइड मोबाईल उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षक घरोघरी भेट देत शेतावरील बांधापर्यंत पोचले.

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

विपरित जीवनशैलीत गुरफटून 

गुरुजींनी दिलेला अभ्यास पूर्ण करून पाळीव प्राण्यांना चारापाणी, घरातील छोटी-मोठी कामे करत लहान भावंडांना सांभाळून पालकांना हातभार लावत आहेत. तर सधन पालकांची मुले ऑनलाइन शिक्षणात मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे विपरित जीवनशैलीत गुरफटून गेले आहेत. गरीब व शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलांकडून शालेय जीवनापासूनच संवेदनशीलता, सौजन्यशील व श्रमप्रतिष्ठेचे धडे गिरवले जात आहेत. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू 

 

मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशन मेंदू, रक्त व त्वचेसाठी फारच घातक असतात. जास्त वेळ मोबाईल हाताळणाऱ्या विशेषतः लहान मुलांना थकवा, ताणतणाव विविध मानसिक आजार होण्याची शक्यता अधिक असते. 
- डॉ. सुश्मिता सोनवणे, बालरोगतज्ज्ञ, सटाणा 

 

एवढा दीर्घकाळ शाळेपासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना कोविडनंतर पुन्हा शालेय वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी शिक्षक व पालकांकडून मुलांना मानसिकदृष्ट्या समुपदेशनाची गरज भासणार आहे. 
- एस. एम. बिरारी, निवृत्त मुख्याध्यापक