ऑनलाईन गेमिंग : फक्त करमणूक नाही, दडलीय मोठी संधी

घरात बसून व्हिडीओ गेम खेळणे कधीकाळी वाईट समजले जात असे. यामुळे आपला मौल्यवान वेळ वाया जातो आणि मिळत तर काहीच नाही असा समज असायचा. त्यामुळे पालक त्यांच्या मुलांनी घरातून बाहेर, मैदानी खेळ खेळावेत यासाठी  प्रयत्न करत असत. पण मागच्या काही दिवसात गेमिंगबद्दल सगळ्यांची मते बदलताना दिसत आहेत. आजकालचे तरुण आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील ऑनलाईन गेमिंगमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

कोरोना महामारीने जगभरातील बरेच व्यवहार ठप्प केले आहेत. कोरोनाचा क्रिडा विश्वाला देखील जबरदस्त फटका बसला आहे. महामारीच्या काळात जगभराती मोठमोठी नामांकित क्रिडा स्पर्धांची आयोजने रद्द करावी लागली. ऑलिम्पिक स्पर्धेपासून ते टेनिस ग्रँडस्लॅम पर्यंतच्या स्पर्धा रद्द झाल्या, क्रिकेट जगताला देखील याचा मोठा फटका बसला. कोरोनामुळे मैदानी खेळांना अवकळा आली हे जरी खरे असले तरी त्यामुळे ई-स्पोर्ट, ऑनलाईन खेळण्यात येणाऱ्या खेळांना मात्र चांगले दिवस आले आहेत. याच काळात बुध्दीबळ खेळ ऑनलाईन खेळायला सुरुवात झाली तर अन्य देशात तर बास्केटबॉल आणि व्हॉलिबॉसचे सामने देखील ऑनलाईन आयोजित केले गेले. 

भारतात देखील या ऑनलाईन गेमिंग, मोबाईल गेमिंग, फँटसी लीग सध्या जोरात खेळले जात आहेत. मागच्या १० वर्षात ऑनलाईन गेमिंगचे मार्केट भारतात खूप मोठे झाले आहे. फक्त पबजीच नाही तर असे वेगवेगळे असंख्य गेम ऑनलाईन खेळले जातात. मोठी बक्षिसे असलेल्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.  भारत हा  गेमिंग क्षेत्रातील जागतली सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे असे मानले जाते. केपीएमजी च्या रिपोर्टनुसार २०१४ मध्ये ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या खेळांची उलाढाल ही २००० कोटी रुपयांची होती.  तर २०१८ साली ती दुप्पट होऊन ४३०० कोटींवर पोहचली. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात हीच उलाढाल विक्रमी होती.  तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या २०२३ सालापर्यंत ही उलाढाल ११८०० कोटीचा टप्पा गाठेल. भारतात छपाट्याने वाढत असलेल्या ई-स्पोर्ट्सला  फँटसी लीगमुळे बळ मिळाले आहे. हेच कारण आहे ज्यामुळे ड्रीम ११ सारख्या कंपन्या सध्या इंडियन प्रिमियर लीग सारख्या भव्य आयोजनाचे प्रायोजक बनल्या आहेत. एका सर्वे नुसार २०२०-२२ या काळात भारतात ४० मिलीयन ऑनलाईन गेमर्स वाढतील असा दावा करण्यात आला आहेत. तसेच या काळात भारतातील गेमिंग इंडस्ट्री ही ४१ टक्के वार्षीक दराने वाढेल. तसेच २०२४ साली गेमिंग इंडस्ट्री ही ३७५० मिलीयन डॉलर्सची असेल असा दावा केला जात आहे.  

काय आहेत यामागची कारणे?

भारतात इंटरनेट सेवेचे दर कमी होणे हे देशात ई-स्पोर्ट मोठ्या प्रमाणात वाढण्याचे सर्वात महत्वाचे कारण आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात इंटरनेट डेटा खूपच स्वस्त आहे. सोबतच भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या देखील लक्षणिय आहे. त्यामुळे ई-स्पोर्ट आता शहरांपासून ते छोट-छोट्या गावांमध्ये देखील पोहचले आहे. आकडेवारनुसार २०१७ पर्यंत ऑनलाईन गेमिंग ध्ये ८९ ट्क्के हिस्सा हा मोबाईल गेमिंगचा होता. तर फक्त अकरा टक्के लोक हे त्यांच्या कंप्यूटरवरुन खेळात सहभागी होत.  तर २०१० मध्ये फक्त दोन कोटी लोक ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असत. त्याचा आकाडा २०१८ मध्ये वाढून २५ कोटींवर पोहचला. यातील बरेचसे लोक हे कोडी सोडवणे यासारख्या खेळांमध्ये सहभागी होतात. 

भारतात ई-स्पोर्ट्ससाठी अफाट शक्यता...

भारतात ऑनलाईन खेळांसाठी उपलब्ध शक्यता आफाट आहेत. २०२१ मध्ये देशातील जवळपास ६१ टक्के लोक हे ३५ वर्ष वयाचे आहेत. याचा थेट फायदा ऑनलाईन खेळांना होतो. गाव-खेड्यात इंटरनेट उपलब्ध झाल्याने लोक देशाच्या  कुठल्याही कोपऱ्यामधून या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतात.तंत्रज्ञान आणि इंफ्रास्ट्रक्चचरसाठी अत्यंत कमी खर्च मात्र जास्त नफा  मिळत असल्याने या क्षेत्रात अनेक मोठ्या कंपन्या लक्ष घालत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे अनेक गेम्स तयार केले जात आहेत. 

ई-स्पोर्ट्सचा इतिहास ..

ई-स्पोर्ट हे जवळपास १९७२ सालापासून खेळण्यात येत आहेत. तेव्हा हे खेळ कॉन्सोलच्या मदतीने खेळण्यात येत असत. टिव्हीवरती २००६ साली अमेरिकेत पहिल्यांदा ईस्पोर्ट्सचे प्रसारण करण्यात आले होते. या प्रकारच्या खेळांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त खेळाडू स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. आजच्या  घडीला डोटा-२ हा ई-स्पोर्ट्समधील सगळ्यात मोठा खेळ आहे. यामध्ये जवळपास १३०० स्पर्धांमध्ये ३५०० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. 

या खेळाडूंना जबरदस्त फॅन फॉलोइंग

भारतात मागच्या काही दिवसांपुर्वी पबजी या गेमवर बंदी घालण्यात आली, पण त्याआधीच ऑनलाईन गेमिंगची ओळख भारतीय तरुणांना झाली होती. भारतातील  प्रोफेशनल पबजी खेळाडू जगभरातील ऑनलाईन चालणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होत होते. इतकेच नाही तर ई- स्पोर्ट्स खेळणारे खेळाडूं ऑनलाईन स्ट्रिमींगच्या माद्यमातून देशातील लहानमोठ्या सर्व शहरापर्यंत ओळखले जातात. अगदी स्टार क्रिकेट खेळाडू किंवा आयपीयलच्या एखाद्या प्रसिध्द संघाचा असतो तसा फॅनबेस या ई-स्पोर्ट्स खेळाडूंना आहे. या खेळाडूंमध्ये स्काऊट, मॉर्टल, व्हायपर, ओवेस अशी बरीच नावे सांगता येतील ज्याचे मिलीयन्स मध्ये फॉलोअर्स आहेत.

ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे कसे मिळतात

या प्रकारच्या स्पर्धेत अनेक संधी आहेत. जसे की, स्पर्धा सुरु असतान समालोचन करणाऱ्याला चांगले पैसे मिळतात. म्हणजे या क्षेत्रात फक्त बोलून देखील पैसे मिळवले जाऊ शकतात. ऑनलाईन गेमिंगसाठी बरेच जण प्रोफेशनल Shoutcaster आहेत ज्यांना दिवसाला तीस हजारांपर्यंत पैसे मिळतात. या शिवाय ऑब्झरव्हर, डिझायनर, एनिमेटर आणि व्हिडीओ एडीटर हे सध्याच्या ई-स्पोर्टमध्ये महत्वाचे जॉब आहेत. प्रत्येक्ष गेमिंग ब्रॉडकास्ट, लाईव्हच्या माध्यामातून गेमर्स पैसे कमवतात. भारतात असे शेकडो गेमर्स आहेत. ज्यांच्या यूट्यूब चॅनल्सवर कोट्यावधी फॉलोअर्स आहेत. उदाहरणार्थ टोटल गेमिंग या भारतातील यूट्यूब चॅनलचे २२.५ मिलीयन सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांच्या व्हिडीओला कोट्यावधी व्ह्यूव्ज मिळतात. यातून त्यांना मिळाणार पैसा अफाट आहे. गेम डेव्हलपींग हे आणखी एक भन्नाट करियर ऑप्शन आहे.