ओझरला आढळला दुर्मिळ ‘अल्बिनो’! आकर्षक रंगाने वेधले लक्ष

ओझर (जि.नाशिक) : येथील सीताईनगर, साईधाम परिसरात दुर्मिळ अल्बिनो जातीचा जवळपास दीड फूट लांबीचा बिनविषारी साप आढळला. 
येथील सीताईनगर, साईधाम येथे राहणारे नाभिक व्यावसायिक संतोष वाघ यांनी घराजवळ ठेवलेल्या विटांच्या ढिगाऱ्यात साप जाताना बघितला. त्यांनी ताबडतोब सर्परक्षक संदीप कराटे यांना फोन केला असता सर्परक्षक कराटे घटनास्थळी पोचले. विटांच्या ढिगाऱ्याखाली लपलेल्या सापाला पकडले.

ओझरला आढळला ‘अल्बिनो’ 

सापाचा रंग नेहमीपेक्षा वेगळा दिसल्याने त्यांनी सर्प अभ्यासक सुशांत रणशूर यांना छायाचित्र पाठविले. हा साप दुर्मिळ प्रकारातील अल्बिनो असून, तस्कर जातीचा असल्याची पुस्ती दिली. या सापाला चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आले. सहाय्यक उपवनसंरक्षक डॉ. सुजित नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेरभैरव वनपरिमंडळ अधिकारी देवीदास चौधरी, वनरक्षक व्ही. आर. टेकणार, वाल्मीक वर्गळ, पूनम साळवे यांच्या उपस्थितीत सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

पांढऱ्या रंगाचा साप 
अल्बिनो सापाचा रंग इतर सापांपेक्षा वेगळा असतो. इतर सापांना जसे रंग आहेत तसा हा साप रंगहीन असून, तो पांढऱ्या रंगाचा असतो. त्याचे डोळे लाल रंगाचे असतात. माणसांना ज्याप्रमाणे कोड असते तसेच प्राण्यांच्या बाबतीत तोच प्रकार लागू होतो. यात सापही त्याला अपवाद नाही. 

अल्बिनिझम हा रंगाचा अभाव असल्याने होतो. गुणसूत्रांमध्ये बदल झाल्याने असे होते. त्यामुळेच असे अल्बिनो प्राणी जन्माला येतात. त्यांचा रंग नैसर्गिक नसल्याने ते निसर्गात जास्त दिवस जगू शकत नाहीत. पण काही साप अल्बिनो असूनही मोठे झालेले निदर्शनास आले आहे. 
-डॉ वरद गिरी, भारतीय सरीसृप व उभयचरतज्ज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, उपसंचालक 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

नागरिकांनी पांढऱ्या रंगाचा, तसेच लाल डोळे असलेला अल्बिनो साप बघितल्यास सर्परक्षक किंवा वन विभाग कार्यालयाशी संपर्क करावा. 
-डॉ. सुजित नेवसे, सहाय्यक उपवनसंरक्षक, नाशिक पूर्व 

रंगाने जन्मतः अल्बिनिझम (कोड) असलेल्या माणसांना जसे उन्हात गेल्यास त्रास होतो. त्याचप्रमाणे अल्बिनो सापालाही उन्हाचा त्रास होतो. अशा सापांना निसर्गात जगणे कठीण होते. पण हा साप जवळपास दीड फूट लांबीपर्यंत वाढला हे विशेष. 
-सुशांत रणशूर, वन्यजीव अभ्यासक, ओझर