ओझर विमानतळावरून हज यात्रेसाठी विमानसेवा सुरू करा; मुस्लिम बांधवांची मागणी 

नाशिक : ओझर विमानतळावरून हज यात्रेसाठी विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खासदार हेमंत गोडसे यांना दिले. पवित्र हज यात्रेसाठी उत्तर महाराष्ट्रातील हजारो, तर शहर-जिल्ह्यातील शेकडो भाविक दर वर्षी जातात. काही महिन्यांपासून उमराह यात्रेला जाणाऱ्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. दोन्ही यात्रांना जाण्यासाठी भाविकांना मुंबईस जावे लागते. तेथून त्यांना विमानसेवा उपलब्ध होते.

हज यात्रेसाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी

भाविक विमानतळावर गेल्यास त्यांना बराच वेळ बाहेरच प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. शिवाय मुंबईपर्यंत जाण्याचा खर्चही वाढतो. हे टाळण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून शहरातील ओझर विमानतळावरून हज यात्रेसाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. मिनी हज हाउसचेही निर्माण करावे, अशी मागणी निवेदनात केली. सर्वधर्मीय श्रद्धास्थान असलेल्या अजमेर शरीपसाठी शहरातून थेट रेल्वेसेवा नाही. मुंबई किंवा मनमाड येथे जावे लागते.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

मुस्लिम बांधवांची मागणी पूर्ण करण्याचे आश्‍वासन

नाशिक रोड येथून रेल्वेसेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करून मुस्लिम बांधवांची मागणी पूर्ण करण्याचे आश्‍वासन गोडसे यांनी दिले. माजी नगरसेवक निजाम कोकणी, ॲड. कैलास खंडबाहले, शेखन खतीब, अक्रम खतीब, समीर हजारी, फारूख तांबोळी, जुबरे हाश्‍मी, शोएब शेख आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ