ओझर विमानतळ अन् रेल्‍वेस्‍थानकांवर प्रवाशांची तपासणी; रस्‍त्‍याने प्रवासावरही प्रशासनाचे लक्ष

नाशिक : अन्‍य राज्‍यांतून रेल्‍वे व विमानाने येणाऱ्या प्रवाशांना राज्‍य सरकारतर्फे कोरोना तपासणी अहवाल सक्‍तीचा केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्‍हा प्रशासनाने सक्रिय भूमिका घेत जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केली आहे. त्‍यानुसार ओझर विमानतळासह नाशिक रोड, देवळाली, निफाड व जिल्ह्यातील अन्‍य रेल्‍वेस्‍थानके, गुजरात-नाशिक मार्गावरील प्रवाशांना कोरोनाची चाचणी बंधनकारक असेल. यासंबंधाने जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी (ता. २४) आदेश जारी केले असून, विमानतळ, रेल्‍वेस्‍थानके, गुजरात सीमेच्‍या ठिकाणी तपासणीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. 

प्रवाशांवर विविध निर्बंध

सद्यःस्‍थितीत राज्‍यातील परिस्‍थिती नियंत्रणात असल्‍याचे मानले जात असले तरी दुसऱ्या लाटेच्‍या शक्‍यतेमुळे सावधगिरी बाळगली जात आहे. गेले दोन महिने नाशिक जिल्‍ह्यातील रुग्‍णसंख्येत लक्षणीय घट झाली असली, तरी दिवाळीनंतर पुन्‍हा दिवसभरात आढळणाऱ्या रुग्‍णांच्‍या संख्येत वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्‍हा प्रशासनातर्फे सावधगिरी बाळगली जात आहे. याचाच एक भाग म्‍हणून नाशिकमध्ये दाखल होणाऱ्या प्रवाशांवर विविध निर्बंध असतील. विमानाने येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाईल. राज्य सरकारने दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरात या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध आणले आहेत. अशातच ओझर विमानतळाहून बेंगळुरू आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू झाली असताना या प्रवाशांना कोरोना नसल्‍याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक असेल. तपासणीदरम्‍यान संशयित आढळणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन व्‍हावे लागण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील सहा रेल्वेस्थानके व गुजरात सीमेवरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाईल. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

तपासणीची ठिकाणे 

-ओझर विमानतळ 
-नाशिक रोड, देवळाली कॅम्‍पसह इगतपुरी रेल्‍वेस्‍थानक 
-निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव रेल्‍वेस्‍थानक 
-गुजरातहून त्र्यंबकेश्र्वर, पेठ, सुरगाण्याला जोडलेल्‍या सीमेवर 

 

दिल्ली, गुजरात, गोवा, राजस्थान येथून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य असेल. जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांसाठी जिल्‍हा प्रशासनाने दिशानिर्देश जारी केले आहेत. प्रामुख्याने ओझर विमानतळ, रेल्वेस्थानके व गुजरात सीमेवरून दाखल होणाऱ्या प्रवाशांसाठी चेकपोस्ट केले आहेत. त्‍यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. 
-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी 
 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ