ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सटाण्यात थेट तहसील कार्यालयावर मोर्चा; पाहा VIDEO

सटाणा (नाशिक) : ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात तातडीने वकिलांची नियुक्ती करावी, ओबीसींची जनगणना करावी तसेच ओबीसी कोट्याला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे यांसह विविध मागण्यांसाठी बागलाण तालुका महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीतर्फे तहसील कार्यालयावर आज (ता.१) रोजी मोर्चा काढण्यात आला. 

समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष भारत खैरणार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रांतिक सदस्य वैभव गांगुर्डे व समितीचे जिल्हाध्यक्ष जगदीश कोठावदे यांच्या नेतृत्वाखाली बागलाण तहसील कार्यालयावर आज (ता.१) रोजी मोर्चा काढण्यात आला. 

 

सकाळी अकरा वाजता येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या मंदिरापासून मोर्चास सुरुवात झाली. ‘जय ज्योती जय क्रांती’, ‘ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे’, ‘एक नवे पर्व ओबीसी सर्व’, ‘आरक्षण वाचवा संविधान वाचवा’ अशा घोषणाबाजी करीत शहर व तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होते. शहरातील प्रमुख बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चार फाटा, बसस्थानकमार्गे मोर्चा तहसील कार्यालय आवारात येताच मोर्चेकर्‍यांनी ठिय्या दिला.

हेही वाचा >> बारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत

मराठा समाज आणि ओबीसी या दोघांचे नुकसानच

यावेळी बोलताना कार्याध्यक्ष भारत खैरणार म्हणाले, ओबीसींचे नेते छगन भूजबळ यांचा मराठा समाजाच्या आरक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे, मात्र ओबीसी कोट्याला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे त्यांनी जाहीर केले आहे. ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींना अवघ्या १७ टक्के जागा दिल्या असून त्यातल्या बारा टक्केच जागा भरल्या आहेत. मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश झाल्यास मराठा समाज आणि ओबीसी या दोघांचे नुकसानच होणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रांतिक सदस्य वैभव गांगुर्डे यांनी आरक्षण हा गरीबी हटाव कार्यक्रम नसून सामाजिक प्रतिनिधित्व देऊन मागास समाजाला राजकीय व शैक्षणिक प्रवाहात आणणे व त्यांचा विकास साधने हाच घटनाकारांचा आरक्षणामागील खरा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. डॉ.दौलतराव गांगुर्डे, सचिन राणे, डॉ.विठ्ठल येवलकर, संजय बच्छाव, संतोष ढोमे आदींची भाषणे झाली. नायब तहसिलदार बहिरम यांना निवेदन देण्यात आले. 

हेही वाचा >> खळबळजनक! तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय

मोर्चात श्रीधर कोठावदे, समको बँकेचे अध्यक्ष कैलास येवला, संचालक जयवंत येवला, डॉ.दौलतराव गांगुर्डे, डॉ.मनीष ढोले, मनोज वाघ, यशवंत कात्रे, सरपंच राकेश मोरे, दादाजी खैरनार, राजेंद्र खानकरी, योगेश अमृतकर, सुनील खैरणार, पंकज ततार, यशवंत येवला, अनिल येवला, मनोज पिंगळे, संजय अमृतकर, शिवा सैंदाणे, सोगोविंद वाघ, विलास दंडगव्हाळ, बापू अमृतकर, अंगद नानकर, प्रकाश मोरे, प्रशांत बागूल, हरिभाऊ खैरणार, बाळासाहेब मोरे, संजय बच्छाव, दिगंबर जाधव, सागर शेलार, जिभाऊ खैरणार, मुरलीधर खैरणार, मोहन गवळी, विजय खैरणार, मनाथ बधान, जगदीश बधान, राहुल येवला, मोहन खैरनार, एकनाथ येवला, महेश येवला आदींसह विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बांधव बहुसंख्येने सहभागी होते.