औष्णिक वीज केंद्रात उच्चांकी मेगावॉट वीजनिर्मिती! वीजग्राहकांना दिलासा

एकलहरे (जि.नाशिक) : महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक वीजनिर्मिती संचातून शुक्रवारी (ता. ५) विजेच्या शिखर मागणीच्या कालावधीत सकाळी सव्वाआठला आठ हजार १०४ मेगावॉट वीजनिर्मितीचा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. अलीकडच्या काळातील राज्यातील औष्णिक वीज केंद्राची विक्रमी वीजनिर्मिती आहे. 

औष्णिक वीज केंद्राची विक्रमी वीजनिर्मिती
राज्यातील वीजग्राहकांना कमीत कमी वीजदरामध्ये सातत्यपूर्ण वीजपुरवठा करण्याकरिता महानिर्मिती नेहमीच योगदान देत आहे. महानिर्मितीची एकूण स्थापित क्षमता १३ हजार १८६ मेगावॉट इतकी असून, यापैकी औष्णिक विद्युत क्षमता नऊ हजार ७५० मेगावॉट इतकी आहे. सध्या महानिर्मितीच्या नऊ औष्णिक वीजनिर्मिती संचांमधून आठ हजार १०४ मेगावॉट, तर एकूण आठ हजार ६८० मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात यश मिळविले आहे. भुसावळ वीजनिर्मिती केंद्र संच क्रमांक ४ व ५, चंद्रपूर संच क्रमांक ८ व ९, खापरखेडा संच क्रमांक ३ व ५, तसेच परळी संच क्रमांक ६ व ८ आणि पारस संच क्रमांक ३ यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्लांट लोड फॅक्टरसह वीजनिर्मिती साध्य केली आहे. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

कमीत कमी खर्चात महानिर्मितीच्या संच

गेल्या अनेक महिन्यांपासून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोळसा पुरवठा सुरळीत करण्यात मोठी भूमिका बजावली असल्याने, तसेच प्रभावी इंधन व्यवस्थापन, विविध उत्कृष्ट कार्यप्रणालीद्वारे कमीत कमी खर्चात महानिर्मितीच्या संचांनी ही विक्रमी सातत्यपूर्ण कामगिरी साध्य करत वीजग्राहकांना दिलासा दिला आहे. ऊर्जामंत्री व महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली महानिर्मितीने ही विक्रमी कामगिरी साध्य केली असून, त्याबद्दल संचालक संचलन राजू बुरडे व कार्यकारी संचालक अभय हरणे यांनी सर्व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा