कंत्राटी कामगारांना मिळणार हक्काची पगारवाढ; नाशिक औष्णिक वीज केंद्रात आनंदाचे वातावरण

एकलहरे (जि.नाशिक) : नाशिक औष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांना हक्काची पगारवाढ व किमान वेतन मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे. या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल या कामगारांनी ‘सकाळ’चे आभार मानले. चाळीस वर्षांपासून येथील कंत्राटी कामगारांना किमान वेतन, पगारवाढ व लोडिंग-अनलोडिंग चार्जेससाठी कायम लढा द्यावा लागला. त्यांच्या होणाऱ्या पिळवणुकीविषयी तसेच बोनस व किमान वेतन याविषयी ‘सकाळ’ने पाठपुरावा केला होता. त्यानंतर स्थानिक प्रशासन व संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली व एक महिन्यात अनेक कंत्राटदारांनी टप्प्याटप्प्याने पगारवाढ दिली. येत्या काही दिवसांत पगारवाढीचा फरक देण्याचेही मान्य केल्याने कामगारांच्या आनंदाला उधाण आले आहे. 
 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

या महिन्यापासून पगारवाढ मिळाली आहे. संबंधित ठेकेदाराने पगारवाढीचा फरक देण्याचेही मान्य केले आहे. हा ‘सकाळ’च्या पाठपुराव्याचा विजय आहे. त्यामुळे आम्ही ‘सकाळ’चे आभार मानतो. 
-मधुराज महाले, कंत्राटी कामगार 

पगारवाढ झाल्याने आम्ही आमच्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकतो. पगारवाढीचा फरक मिळणार असल्याने आमची काही स्वप्नं निश्‍चितच पूर्ण होण्यास मदत होणार आहे. 
-किरण लोखंडे, कंत्राटी कामगार  
 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय