कचरा विकून ग्रामपंचायतीस मिळणार उत्पन्न; सुमारे आठ टन प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन 

नाशिक : जिल्हा परिषद आणि सेवा संस्था नाशिक यांचा संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा’ अभियान अंतर्गत पिंपळगाव ग्रामपंचायत हद्दीत साचलेल्या कचऱ्यामधून एका दिवसात ८ टन प्लॅस्टीक कचरा स्वतंत्र करत संकलित करण्यात आला. सदरचा कचरा विकून ग्रामपंचायतीस उत्पन्न मिळणार आहे. 
 

कचरा विकून ग्रामपंचायतीस मिळणार उत्पन्न

गोदावरी नदी प्रदुषण मुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद व सेवा संस्था यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. यात जिल्ह्यातील निवडक ग्रामपंचायतीमध्ये संस्थेच्या महिला ह्या नागरिकांच्या घरोघरी जावून कचरा संकलित करतील. तसेच नदीकाठावरील कचऱ्यातून प्लॅस्टीक कचरा स्वतंत्र करून तो विकतील. मोहिमेचा शुभारंभ पिंपळगाव ग्रामपंचायतमधून झाला. या वेळी ३० कचरा वेचक महिलांनी गावातील कचऱ्याच्या डोंगरामधून प्लॅस्टिक कचरा स्वतंत्र केला. या वेळी एका दिवसात ८ टन प्लॅस्टिक कचरा हा निघाला. पुढील ३० दिवस हा उपक्रम राबविला जाणार आहे. संपूर्ण कचरा संकलित झाल्यानंतर मशीनद्वारे खत, दगड, गोटे, माती रेती बाजूला करून संपूर्ण कचऱ्याचे डोंगर नष्ट केले जाणार आहेत व भविष्यात असे डोंगर तयार होणार नाहीत याचे नियोजन केले जाणार आहे. जिल्ह्यातील निवडक १३ ग्रामपंचायतीमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.

गोदाकाठावरून आठ टन प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन 

हा कचरा हा तीन रूपये किलो दराने विकला जाणार असून यातून २४ हजार रूपयांचे उत्पन्न हे ग्रामपंचायतीस मिळणार आहे.  उपक्रमांच्या सुरवातीस उद्‌घाटन आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेळकंदे, गटविकास अधिकारी संदीप कराड, सरपंच बनकर, ग्रामसेवक लिंगराज जंगम, स्वच्छता निरीक्षक संदीप जाधव, सेवा संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजपालसिंग शिंदे, विजय कसबे, भीमा पाटील उपस्थित होते.