कचऱ्यातून साकारले ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य; वैनतेयच्या शिक्षकाचे कौतुक 

निफाड (जि. नाशिक) : येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिराचे उपक्रमशील शिक्षक गोरख सानप यांनी कचऱ्यात वाया गेलेल्या वस्तूंचा वापर करून तयार केलेल्या ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य  बनवले आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. 

 आकर्षक शैक्षणिक साहित्य

सानप यांनी पाण्याच्या बाटलीच्या २१ हजार झाकणांचा वापर करून कचऱ्याचे व्यवस्थापन करीत आकर्षक साहित्य तयार केले आहे. कालबाह्य झालेल्या सीडी, रिकामी खोकी, काडेपेटी, पावडरचे डबे, भरण्या अशा विविध टाकाऊ साहित्याचा वापर करून कमी खर्चात आकर्षक शैक्षणिक साहित्य तयार केले आहे. विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने अध्ययन-अनुभव देण्यासाठी शब्दकार्ड, अक्षर मुकुट, पाढ्यांच्या पट्ट्या, दशक-शतक माळा, शब्दडोंगर, पझल्स वाक्य बनवा, शतक पाटी, दशक खुळखुळे, चौदाखडीचे तोरण, शिवरायांचा द्विमिती चित्रमय इतिहास यांसारखे अतिशय आकर्षक शैक्षणिक साहित्य तयार केले आहे. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

जिल्ह्यातील विविध शाळांतील मुख्याध्यापकांची भेट

माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के सावंत, कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाठ, सचिव एस. बी. देशमुख, न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक विश्वस्त वि. दा. व्यवहारे, सचिव रतन वडघुले व जिल्ह्यातील विविध शाळांतील मुख्याध्यापकांनी भेट दिली. वैनतेयचे प्राचार्य डी. बी. वाघ, उपप्राचार्य एस. पी. गोरवे, पर्यवेक्षक बी. आर. सोनवणे, योगेश्वरचे मुख्याध्यापक सी. एस. वाघ, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे, राज्य पुरस्कार विजेते मुख्याध्यापक भाऊसाहेब मोकळ, शिक्षक किरण खैरनार व जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. 

सानप यांनी तयार केलेले शैक्षणिक साहित्य अतिशय सुंदर, कमी खर्चिक, टिकाऊ, मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे आहे. मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी अशा सर्व माध्यमांच्या शाळांमधून या साहित्याचा जास्तीत जास्त वापर व्हावा. यू-ट्यूब चॅनल सुरू करून इतर शिक्षकांना शैक्षणिक साहित्य तयार करण्याची प्रेरणा व माहिती मिळेल. 
- वैशाली वीर-झनकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, जिल्हा परिषद 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट