कचऱ्यात सापडलेली हिऱ्याची अंगठी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केली परत

कचऱ्यात सापडलेली हिऱ्याची अंगठी ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; निर्माल्यासह कचऱ्यात गेलेली लाखो रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी तसेच घंटागाडीच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या सहा तासांत शोधून काढत मूळ मालकास परत केल्याची सुखद घटना नाशकात घडली आहे. हिऱ्याची अंगठी परत देणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शहरातील खाबिया ग्रुपचे संचालक प्रवीण खाबिया व सपना खाबिया या दाम्पत्याने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विधिवत पूजन करून दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेचे साहित्य बाजूला करत निर्माल्य कचऱ्यासह महापालिकेच्या घंटागाडीत टाकले होते. या निर्माल्यासोबत हिऱ्याची अंगठीही घंटागाडीत गेल्याचे खाबिया यांच्या लक्षात आले. ही अंगठी ३१ वर्षांपूर्वी प्रवीण खाबिया यांनी पत्नी सपना यांना एंगेजमेंटवेळी दिली होती. ही अंगठी हरवल्यामुळे त्या बेचैन झाल्या होत्या. त्यामुळे खाबिया यांनी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांना दूरध्वनीवरून घडलेला प्रकार कथन केला. कमोद यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांना माहिती कळविली. डॉ. पलोड यांनी तत्काळ सूत्रे हलविली. विभागीय स्वच्छता निरीक्षक बाळू बागूल, घंटागाडी ठेकेदार चेतन बोरा तसेच घंटागाडी कर्मचारी हे अंगठीच्या शोधमोहिमेत सहभागी झाले. कचऱ्यासोबत खतप्रकल्पावर गेलेली हिऱ्याची अंगठी अवघ्या सहा तासांत शोधण्यात यश आले. खाबिया यांना ही अंगठी परत करण्यात आली.

यावेळी खाबिया यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सेवानिवृत्त महासंचालक हरीश बैजल, सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे, सदस्य मनीषा रौंदळ यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, योगेश कमोद, बाळू बागूल, राजू गायकवाड, वॉटरग्रेसचे कर्मचारी धनराज साळवे, शंतनू बोरसे, प्रभाग निरीक्षक वसिम खान, अजिम खान, युसूफ कुरैशी, सचिन हरिजन यांचा मनपा मुख्यालयात सत्कार केला.

हेही वाचा :

The post कचऱ्यात सापडलेली हिऱ्याची अंगठी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केली परत appeared first on पुढारी.