कधी थांबणार शिक्षणाचा खेळखंडोबा? ऑनलाइन-ऑफलाइनच्या गोंधळात पालक, विद्यार्थी चिंतीत 

चांदोरी (जि.नाशिक) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पालक, विद्यार्थी चिंतीत आहेत. नेटवर्कअभावी ऑनलाइन शिक्षण चालेना अन् ऑफलाइन शिक्षणाची गाडी रुळावर येईना, असे चित्र ग्रामीण भागात निर्माण झाले आहे. हा घोळ कधी संपणार, असा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांना पडला आहे. 

कधी थांबणार शिक्षणाचा खेळखंडोबा? 
जिल्ह्यातील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पालकमंत्र्यांनी दिला. दहावी व बारावीच्या परीक्षा अनुक्रमे २९ एप्रिल व २३ एप्रिलला सुरू होणार आहेत. बोर्डाने वेळापत्रकही जाहीर केले आहे. पण शाळा बंद असल्याने शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शाळा न भरताच परीक्षेला सामोरे जाण्याची परिस्थिती विद्यार्थ्यांवर ओढवली आहे. 
चालू शैक्षणिक वर्षात बराच काळ ऑनलाइन शिक्षण दिले गेले. ४ जानेवारीपासून वर्ग सुरू केले. तोच पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. ऑनलाइन शिक्षणामुळे वर्षभरात विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय कमी झाली आहे.

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

ऑनलाइन-ऑफलाइनच्या गोंधळात पालक, विद्यार्थी चिंतीत 

शाळा बंदच राहिल्या, तर सरळ बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर येईल. मर्यादित काळात उत्तरपत्रिकेचे लिखाण पूर्ण होणार का, हा प्रश्न आहे. शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयात शिक्षण विभाग, महसूल, आरोग्य, स्थानिक प्रशासनात एकमत नाही. जबाबदारी दुसऱ्या खात्यावर ढकलण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडून होत आहे. शाळा सुरू करण्याचे मोठे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी स्थानिक प्रशासन तयार नाही. त्यामुळे येऊ घातलेल्या बोर्डाच्या परीक्षेत ग्रामीण भागातील देशाचे भवितव्य अंधारात चाचपडत आहे. 

हेही वाचा  - नाशिकमध्ये कोरोनाचा युरोपियन स्ट्रेन आढळला

स्थानिक प्रशासनावर न सोपवता शासनदरबारी त्यावर ठोस निर्णयाची आवश्यकता आहे. कोरोना खबरदारीच्या योजना प्रभावीपणे राबवून शिक्षण सुरू ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. 
- शांतिलाल कुमावत, पालक 

 

वर्षभर ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना घरी जाऊन ऑफलाइन शिक्षण देत आहोत. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. ऑनलाइन अध्यापनात सहशालेय उपक्रम, मुलांच्या भावविश्वात जाऊन मुलांसारखे होता येत नाही. केवळ पुस्तकी ज्ञान मुलांना मिळत आहे. 
- बाजीराव कमानकर, शिक्षक, भेंडाळी