कधी वाटलंही नव्हतं लग्न होईल…! पण, वयाच्या ४३ व्या वर्षी…

लग्न

नाशिक : दीपिका वाघ

प्रकाश (नाव बदललेले) मी एक शेतकरी आहे. एचआयव्हीची बाधा झाल्यानंतर जगण्याची आशा सोडून दिली होती. पण, औषधोपचारांनी बरा होत गेलो. कधी लग्न होईल, संसार असेल, मूल असेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण, वयाच्या ४३ व्या वर्षी लग्न झाले. आज आठ वर्षांचा निरोगी मुलगा आहे आणि संसारही सुखाचा सुरू आहे. (World AIDS Day)

कर्करोग, टीबी, बीपी, मधुमेह रुग्णांकडे सहानुभूतीने बघितले जाईल पण, एड्स म्हटले की बापरे! रक्त संक्रमण आणि असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे एड्सची बाधा होत असल्याने एड्सकडे बदनाम आजार म्हणून बघितले जात होते. परंतु, आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आई, वडील बाधित असले तरी होणारे बाळ पूर्णपणे निरोगी जन्माला येऊ शकते. बाधित रुग्णांचे लग्न जुळतात, समाजात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून, हे सर्व सामाजिक संस्था, सिव्हिल सर्जन, एआरटी सेंटर तिथे काम करणारे डॉक्टर्स, कर्मचारी, समुपदेशक यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. यामुळे एचआयव्ही बाधित आनंददायी, निरोगी आयुष्य जगत आहेत. (World AIDS Day)

औषधोपचार कधीही थांबवू नका

एचआयव्ही बाधा (World AIDS Day)  झाल्यानंतर औषधोपचार कधीही थांबवू नये. आता बरं वाटतं म्हणून रुग्ण मध्येच स्वत:च्या मर्जीने औषधे थांबवतात. काही काळानंतर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यानंतर टीबी, नागीण, कावीळ असे वेगवेगळे आजार व्हायला सुरुवात होते. मग डॉक्टरांना नेमके कोणत्या आजारावर उपचार करावेत, असा गोंधळ होतो. त्यामुळे बाधा झाल्यानंतर औषधोपचार, नियमित तपासणी करत राहणे गरजेचे असते. समजा २५ व्या वर्षी बाधा झाल्यानंतर नियमित औषधे घेतली तर रुग्ण ७० वर्षांपर्यंत जगू शकतो.

नवनवीन औषधोपचार उपलब्ध झाल्याने संक्रमित आईकडून बाळाला आजार होण्याचे प्रमाण पूर्वी ३० टक्के होते. आता एक टक्क्यापेक्षा कमी प्रमाण झाले आहे. शासकीय एआरटी (अॅण्टी रिट्रोव्हायरल थेरपी) सेंटरमध्ये मोफत औषधोपचार केले जातात. गरोदर महिलेने पहिल्या महिन्यापासून औषधोपचार नियमित घेतले तर बाळाला इन्फेक्शन होण्याचे प्रमाण कमी होते.

– डॉ. सुनील ठाकूर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय, नाशिक

 

संस्थेकडून दरवर्षी बाधितांचा वधू-वर मेळावा घेतला जातो. आजवर ८ मेळावे झाले असून, यंदाचा नववा मेळावा असणार आहे. यामध्ये आत्तापर्यंत ३७ जोडप्यांचे लग्न झाले असून, सर्वांचे सुखाचे संसार सुरू आहेत. २०३० पर्यंत आजाराचा पूर्णपणे नायनाट होईल, असे प्रयत्न संस्थेकडून सुरू आहेत.

– महेंद्र मुळे, अध्यक्ष, नाशिक नेटवर्क

हेही वाचा :

The post कधी वाटलंही नव्हतं लग्न होईल...! पण, वयाच्या ४३ व्या वर्षी... appeared first on पुढारी.