कधी संपणार दुष्टचक्र? पाच एकर शेती असूनही कर्जाचा बोझा; शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

तळवाडे दिगर (नाशिक) : पाच एकर शेती असूनही एका शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविल्याचे समोर आले आहे. कर्जाचा बोझा आणि आर्थिक विवंचनेत असणाऱ्या तळवाडे दिगर येथील एक दुर्देवी घटना...

पाच एकर शेती असूनही कर्जाचा बोझा

सुनील पगार यांची तळवाडे दिगर येथे पाच एकर शेती असून, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी शेतीवर एचडीएफसी बँकेचे व्याजासह २१ लाख, तर डांगसौंदाणे येथील सप्तशृंगी महिला बँकेकडून पाच लाखांचे कर्ज घेतले होते. तसेच शेतीच्या भांडवलासाठी हातउसनवार केली होती. यातच मागील दोन वर्षांपासून भाजीपाला पीक चांगले आले नाही. त्यामुळे मित्रमंडळी व नातेवाइकांकडून हातउसनवार पैसे घेतले होते. घेतलेले कर्ज कसे फेडणार, या विवंचनेत ते कायम असायचे. दरम्यान, सकाळी ते शेतातील टरबूज फवारणीसाठी गेले असता, आंब्याच्या झाडास गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

हेही वाचा >  ‘कोब्रा-घोणस’च्या लढाईचा थरार! मांजराने केली मध्यस्थी; पाहा VIDEO

पोलीसांकडून पंचनामा

वडिलांच्या मदतीसाठी गेलेल्या त्यांच्या मुलाने सर्व प्रकार पाहिल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी सटाणा पोलिसांना माहिती दिली. पोलिस नाईक पंकज सोनवणे यांनी पंचनामा केला. पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक पंकज सोनवणे, जयंतसिंग सोळखे तपास करीत आहेत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे.  

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

कुटुंबाचा उदर्निवाह कसा चालवायचा?

मागील काही वर्षांत शेतात सततची नापिकी असल्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने कुटुंबाचा उदर्निवाह कसा चालवायचा, या विवंचनेत असणाऱ्या तळवाडे दिगर येथील एका शेतकऱ्याने शुक्रवारी (ता. २२) गळफास लावून आत्महत्या केली. सुनील बाळू पगार (वय ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, याप्रकरणी सटाणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.