कपालेश्‍वर मंदिर भाविकांसाठी तीन दिवस बंद; संभाव्य गर्दी लक्षात घेत पोलिस प्रशासनाचा निर्णय 

पंचवटी (नाशिक) : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यातील महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने बुधवार (ता. १०) ते शुक्रवार (ता. १२) असे सलग तीन दिवस कपालेश्‍वर महादेव मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचे आदेशित केले आहे. त्या मुळे यंदा भाविकांना मंदिरात जाऊन ‘बम बम भोले’चा गजर करता येणार नाही. 

तीव्रता कमी होत असलेल्या कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यासह शहरात मोठ्या प्रमाणावर आढळून येऊ लागले आहे. त्या मुळे धास्तावलेल्या पोलिस प्रशासनाने महाशिवरात्रीच्या दरम्यान कपालेश्‍वर मंदिर बंद ठेवणार आहे. त्या मुळे संपूर्ण भारतभरातील नंदी नसलेल्या एकमेव शिवालयात भाविकांना जाता येणार नाही. मंदिराच्या आख्यायिकेमुळे दर वर्षी महाशिवरात्रीला हजारो शिवभक्त दर्शनासाठी पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत गर्दी करतात. त्या मुळे पोलिस प्रशासनाने यंदा कडक धोरण स्वीकारत मंदिराच्या परिसरात भाविकांना बुधवारपासून शुक्रवारपर्यंत बंदी घातली आहे. 

विशेष म्हणजे कोरोनाच्या वाढत्या उद्रेकानंतर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात देऊळबंदी केली होती. साधू, संत व महंताच्या मागणीनंतर ती अलीकडे मागे घेतली होती. तरीही मंदिरामध्ये पूर्वीसारखी गर्दी होत नसल्याचे चित्र आहे. मात्र, कपालेश्‍वराचे धार्मिक महत्त्व मोठे असल्याने होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेत पोलिस प्रशासनाने बंदीचा निर्णय घेतला आहे. 

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडिंग 

महाशिवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. ११) मंदिरातील मोजक्या पुजारी, गुरव वर्गाच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडण्याच्या सूचना पंचवटी पोलिसांनी केल्या आहेत. या काळात मंदिरात गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. पोलिस प्रशासन व देवस्थानचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत गर्दी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडिंगही करण्यात येणार आहे. 

बैठकीत टवाळखोरीवर चर्चा 

दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त देवस्थान बंद ठेवायचे की खुले, यासाठी आज झालेल्या बैठकीत सहाय्यक पोलिस आयुक्त जाधव, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, कपालेश्‍वर देवस्थानचे विश्‍वस्त ॲड. भाऊसाहेब गंभिरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. बैठकीत देवस्थान परिसरात अलीकडे वाढलेल्या टवाळखोरीवरही चर्चा झाली. मंदिरातील गर्दी टाळण्यासाठी भाविकांसाठी परिसरात देवस्थानतर्फे भाविकांच्या दर्शनासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आल्याचे विश्‍वस्त ॲड. भाऊसाहेब गंभिरे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा