करआकरणी खासगीकरणावरून भाजप कोंडीत; शिवसेनेकडून घेरावाची शक्यता

नाशिक : गेल्या महिन्यातील महासभेत मागच्या दाराने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीच्या खासगीकरणाचा ठराव पारित करून त्यानंतर महासभेवर विषय न ठेवताच परस्पर नामंजूर करण्यात आल्याने या विषयावरून सत्ताधारी भाजपला शिवसेना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. 

महासभेत शिवसेनेकडून घेरावाची शक्यता 

कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव डिसेंबर महिन्यात झालेल्या महासभेत जादा विषयातून मंजूर केला होता. आमदार सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले यांच्यासह नगरसेवकांनी ठरावाला विरोध करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे खासगीकरण झाल्यास पक्षाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे व महापालिका निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने ठराव नामंजूर करण्यात आला. ठराव रद्द करताना शिवसेनेच्या बड्या नेत्याचा यामागे हात असल्याचा आरोप सभागृहनेते सतीश सोनवणे यांनी केला होता. त्याला शिवसेनेनेही ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असे संबोधत प्रत्युत्तर दिले होते. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. १९) महासभा होत असून, त्यात घरपट्टी, पाणीपट्टी वसुली खासगीकरणाच्या मुद्द्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मंजूर केलेला ठराव मागे घेताना महासभेवर चर्चा झाली पाहिजे. त्यानंतरच ठराव मागे घ्यावा लागतो, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

सफाईच्या देयकाचा आठव्यांदा प्रस्ताव 

दादासाहेब गायकवाड सभागृह व वाहनतळाच्या साफसफाईच्या ठेक्याची देयके देण्यावरून वाद झाला आहे. सात वेळा तहकूब केलेला प्रस्ताव पुन्हा आठव्यांदा महासभेवर चर्चेला आणला जात असल्याने प्रस्ताव चुकीचा असेल, तर नामंजूर का केला जात नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व गटनेते विलास शिंदे यांनी केला आहे.  

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क