कर्तव्य अन् प्रतिष्ठेपेक्षा पोलीस हवालदाराला ५ हजार वाटले मोठे; रात्री ड्युटीवर असतानाचा प्रकार

मालेगाव (जि.नाशिक) : कर्तव्य अन् प्रतिष्ठेपेक्षा एका पोलीस हवालदाराला ५ हजार रुपये मोठे वाटले. त्यामुळे तेच पाच हजार रुपये त्यास चांगलेच महागात पडले आहेत. रात्री ड्युटीवर असतानाचा हा प्रकार घडला आहे.

कर्तव्य अन् प्रतिष्ठेपेक्षा पोलीस हवालदाराला ५ हजार वाटले मोठे

हवालदार श्रावण माळी मालेगावच्या आयेशानगर पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे. माळी रात्री ड्युटीवर येताच संशयिताच्या भावाने त्यांना पोलिस ठाण्याबाहेरील रस्त्यावर बोलावून पाच हजार रुपये दिले. त्याचवेळी सापळा रचून बसलेल्या लाचलचुपतच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना अटक केली. आयेशानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर व परिसरातील नागरिकांकडे लाचेची मागणी झाल्यास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन पिंगळे यांनी केले आहे.  

सापळा रचून मध्यरात्री अटक

आयेशानगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात संशयित आरोपीला मदत करण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेताना हवालदार श्रावण माळी (वय ५४) यांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मध्यरात्री अटक केली. संशयिताच्या भावाने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. माळी आयेशानगर पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे. तक्रारीची खातरजमा होताच नाशिक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नीलेश सोनवणे, उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत भामरे, उज्ज्वल पाटील व सहकाऱ्यांनी रात्री पोलिस ठाण्यासमोर सापळा रचला.