Site icon

कर्नाटक निवडणुकीत नाशिकचे तिघे शिलेदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेससह इतर प्रादेशिक पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने संपूर्ण देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. भाजप आणि काँग्रेसने प्रचारात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठवितानाच विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून एक तर काँग्रेसकडून नाशिकच्या दोघा शिलेदारांना प्रचारात उतरविले आहे. त्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, नाशिक काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड तसेच आदिवासी समाजाचे नेते लकी जाधव यांचा समावेश आहे.

कर्नाटक विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसने कंबर कसली आहे. भाजपने केंद्रीय मंत्र्यांसह खासदार आणि स्टार प्रचाराकांवर प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे. काँग्रेसकडूनही मातब्बरांना मैदानात उतरविले आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती भागात महाराष्ट्रातील राज्य नेत्यांवर प्रचाराची धुरा सोपविण्याचा निर्णय भाजप आणि काँग्रेसने घेतला. मतदारसंघनिहाय दोन्ही पक्षांकडून निरीक्षक नेमण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित पक्षनिरीक्षकांच्या संघटन कौशल्य तसेच स्थानिक जाती वर्गाचा विचार करण्यात आला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ना. डॉ. पवार तर काँग्रेसकडून ॲड. छाजेड आणि जाधव हे प्रत्यक्ष प्रचारात उतरले आहे. ना. डॉ. पवार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्या कर्नाटकमध्ये तळ ठोकून आहे. तर ॲड. छाजेड यांच्यावर हिलीयाल तर आदिवासी नेते जाधव यांच्यावर येमकनमर्डी या मतदारसंघाच्या निरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजप आणि काँग्रेसकडून प्रचारक म्हणून संधी मिळाल्याने त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावत प्रचारावरही जोर दिला आहे. बूथनिहाय आढावा घेऊन मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न प्रचाराकांकडून सुरू आहे.

ना. डॉ. पवारविरुध्द जाधव सामना
कर्नाटकच्या १५ पेक्षा जास्त मतदारसंघांवर आदिवासी समाजाचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे भाजपने आदिवासी समाजाच्या नेत्या तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार तर काँग्रेसने अखिल आदिवासी परिषदेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या लकी जाधव यांना प्रचारात उतरविले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ना. डॉ. पवारविरुध्द जाधव असा सामना रंगत आहे. त्यात कोणाची सरशी होते ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा:

The post कर्नाटक निवडणुकीत नाशिकचे तिघे शिलेदार appeared first on पुढारी.

Exit mobile version