कर भरणा अहवाल सादर न झाल्याने प्रशासकांची कार्यवाही

मालेगाव महानगरपालिका pudhari.news

नाशिक, मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी मंगळवारी (दि. १३) अधिकारी व सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार व संकिर्ण करवसुली विभागाकडील गाळेधारक व इतर थकबाकीदार यांच्यावर धडक कारवाई करणेकामी संबंधित विभागप्रमुखांना आदेश दिले. यावेळी सर्व विभागप्रमुख यांनी त्यांचे अखत्यारितील सर्व कर्मचारी यांची घरपट्टी व पाणीपट्टी भरलेबाबतचा अहवाल सादर न केल्याने सर्व प्रभाग अधिकारी व विभागप्रमुखांचे माहे जानेवारी २०२४ चा पगार थांबविण्याचे आदेश आयुक्त जाधव यांनी आस्थापना विभागास दिले आहेत.

फेब्रुवारी २०२४ अखेर थकबाकीच्या रकमेत व्याजावर ७० टक्के सवलत देण्यात आली असून, याबाबत थकबाकीदाराशी संपर्क करून दैनंदिन वसुलीचा इष्टांक सर्व प्रभाग कार्यालयाने गाठावा, असे निर्देश प्रभाग अधिकाऱ्यांना दिले विभागप्रमुखाच्या आढावा बैठकीत प्रामुख्याने करवसुलीवर भर देण्यात आला. थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अनधिकृत नळकनेक्शन धारकांनी निर्धारित केलेली पाणीपट्टी न भरल्यास त्यांच्यावर मनपाची पाइपलाइन फोडणे, पाणीचोरी करणे, महानगरपालिका मालकीचे मालमत्तेची हानी करणे अशा प्रकरणी २५ हजार रुपये याप्रमाणे दिनांक ३१ मार्च २०२४ पावेतो आणि त्यापुढील प्रतिवर्ष पाच हजार बसूल करण्यात येणार आहे. तसेच अनधिकृत नळधारकाविरुद्ध पोलिस ठाण्यात प्रभाग अभियंता यांचेमार्फत गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले.

या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त राजेंद्र फातले, उपायुक्त सुहास जगताप, हेमलता डगळे, लेखाधिकारी राजू खैरनार, सहायक आयुक्त अनिल पारखे, सचिन महाले, हरीश डिंबर, शहर अभियंता कैलास बच्छाव, उपअभियंता शांताराम चौरे, सचिन माळवाळ, मुख्य अग्रिशमन अधिकारी संजय पवार, नगरसचिव साजिद अन्सारी, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, प्रभाग अधिकारी फय्याज अहमद, भरत सावकार, रमाकात धामणे, संतोष गायकवाड, श्याम कांबळे, नीलेश पाटील, अ. कदिर अ. लतिफ, वाहन अनिल कोठावदे, एकबाल जान मोहम्मद, आनंदसिंग पाटील, जुबैदा अन्सारी, जनगणना कांताबाई सोनवणे आदी विभागप्रमुख उपस्थित होते.

थकबाकीदारांनी आपल्याकडे थकीत असलेल्या सर्व करांची रक्कम मनपाच्या चारही प्रभाग कार्यालयांत सुट्टीच्या दिवशीदेखील भरणा करून मालमत्ता जप्ती तसेच इतर कटू कारवाई टाळावी अनधिकृत नळ कनेक्शनधारकांनी देखील आपले नळकनेक्शन अधिकृत करून घेत याकरिता येणाऱ्या रकमेचा तत्काळ भरणा करुन कटू कारवाईचा प्रसंग टाळण्याचे आवाहन आयुक्त जाधव यांनी केले आहे.

तीन वर्षांची पाणीपट्टी भरून नळकनेक्शन अधिकृत करा
अनधिकृत नळजोडणी धारकांबाबत त्यांना त्याचे अनधिकृत नळजोडणी अधिकृत करणेबाबतची संधी मालेगाव महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेली असून, अनधिकृत नळकनेक्शनधारक यांच्याकडून तीन वर्षांची पाणीपट्टीची एकूण रक्कम ७ हजार ८४० रुपये भरून नळजोडणी अधिकृत करून घेता येईल, यासाठी आयुक्त यांनी अनधिकृत नळजोडणीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन केलेले असून, या पथकाद्वारे विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पथकामध्ये प्रभाग पाणीपुरवठा अभियंता, विभागप्रमुख, संबंधित प्रभागाचे पाणीपुरवठा विभागाकडील मानधन अभियंता, संबंधित प्रभागाचे फिटर, दोन मजूर, व्हिडिओ कॅमेरामन यांचा समावेश असलेले पथक स्थापन केलेले आहे.

हेही वाचा:

The post कर भरणा अहवाल सादर न झाल्याने प्रशासकांची कार्यवाही appeared first on पुढारी.