कश्यपी धरण पर्यटकांनी फुल! ना कोरोनाची भीती; ना सोशल डिस्टन्स, केवळ मौजेची धुंद

गिरणारे/ गंगापूर : सध्या नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. तरीही काही जण मौजमजेसाठी शनिवारी, रविवारी थेट कश्यपी धरणावर मोठ्या संख्येने येत आहेत. यामुळे धरणकाठच्या भागातही कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशी भीती काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

कोरोनाबद्दल गांभीर्य नाही

नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील कश्यपीसह गंगापूर धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी काही बेधुंद पर्यटक सेल्फी घेण्यासाठी थेट प्रतिबंधित क्षेत्रात पाण्याजवळ जातात, प्रसंगी दुर्दैवी घटनाही घडतात. या भागात वाढते हॉटेलिंग व त्यात हौशी मंडळींचा मौजमजेचा हॉटस्पॉट म्हणून कश्यपी धरणाला प्रथमच पसंती असते. सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे. नाशिक शहरातील चौकाचौकांत बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. रोज काही हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुळे बाधित होत आहेत. घराबाहेर पडू नका, असे प्रशासकीय आवाहन असतानाही काही धनदांडगी मंडळी चारचाकी घेऊन थेट गंगापूर अथवा कश्यपी धरण गाठतात. धरणकाठी बिनधास्त मौजमजा सुरू असते. यामुळे संसर्गाचा धोका या भागात अधिक होऊ शकतो. मात्र, यावर अजूनही कोणी गांभीर्याने घेत नाही. 

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप

कश्यपी धरणाच्या काठावर सुटीच्या दिवशी तरुण- तरुणींची गर्दी असते. धरणाजवळ जाणे धोकादायक आहे, असे फलक असतानाही मंडळी धरणावर मिळेल तिथे फिरतात. मात्र, शहरातून कश्यपी धरणावर येणाऱ्या मंडळींच्या माध्यमातून कोरोना संसर्ग या भागात वाढू शकतो. या भागातील मोलमजुरी करणाऱ्यांना कोरोनाची लागण परवडणार नाही. आता आठवडेबाजारांच्या गावात कोरोना वाढतोय, आदिवासी भागातही तो पोचल्याने बाहेरून येणाऱ्यांना रोखण्यासाठी प्रशासनाने अधिक पुढाकार घेतला पाहिजे. 
-हिरामण बेंडकोळी 

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार