कसमादेचे भूमिपुत्र पुरस्कारांनी सन्मानीत! भूमिपुत्रांच्या पाठीवर ‘सकाळ’ची शाबासकीची थाप

मालेगाव (जि.नाशिक) : ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे कसमादेसह चांदवड, नांदगाव परिसरात सामाजिक, राजकीय, सहकार, सांस्कृतिक, वैद्यकीय, प्रशासकीय, कृषी व शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांचा येथील ऐश्‍वर्या लॉन्समध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात ‘गौरव भूमिपुत्रांचा’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, ग्रामविकासाचे प्रणेते भास्करराव पेरे-पाटील (पाटोदा) व सिनेअभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर यांच्या हस्ते भूमिपुत्रांचा गौरव झाला. कोरोना काळातील उल्लेखनीय कार्य करत कसमादेच्या भूमीची मान उंचावणाऱ्या या भूमिपुत्रांच्या पाठीवर ‘सकाळ’ने शाबासकीची थाप देत त्यांची जबाबदारी वाढविली आहे. 

समाजातील ही रत्न समाजापुढे आणण्याचा प्रयत्न
‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी प्रास्ताविकात कसमादेच्या भूमिपुत्रांच्या सन्मानामागची ‘सकाळ’ची भूमिका विषद केली. या मातीत जन्मलेल्या कर्तृत्ववानांचा कौतुक सोहळा याच भूमीत झाला पाहिजे. भूमिपुत्रांचा गौरव-सन्मान ज्या भूमीत होतो त्यासारखा आनंद आणि समाधान देणारी बाब कोणतीच नसते. समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना जोपासत समाजातील ही रत्न समाजापुढे आणण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने केल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

कसमादेतील ५३ गुणिजनांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कौतिक पगार संचालित महाराजा युवा फाउंडेशनचे भूषण पगार सोहळ्याचे सहप्रायोजक होते. मिडिया इव्हेन्टस्‌ ॲन्ड एक्झिब्युटर्सचे नितीन मराठे व नातू केटर्सचे वैभव नातू यांचे सहकार्य लाभले. ‘सकाळ’चे महाव्यवस्थापक (जाहिरात) उमेश पिंगळे यांनी आभार मानले. 

डॉ. तात्याराव लहाने : माणसाच्या अंगी जिद्द असेल तर काहीही साध्य होत असते. इच्छाशक्ती प्रबळ असून उपयोग नाही, मेहनत करण्याची मानसिकता यशाचा पल्ला गाठून देते. रस्ता नसलेल्या छोट्याशा खेड्यातील माणूस आज राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरतो, हे शिक्षणामुळे शक्य झाले. ग्रामीण भागातील गुणिजनांना गौरव करण्याचा ‘सकाळ’चा उपक्रम स्तुत्य आहे. ‘सकाळ’ने प्रत्येक क्षेत्रातील हिरे शोधून त्यांना प्रेरित केले. प्रत्येक जिल्ह्यात ‘सकाळ’ने अशा उपक्रमासाठी पुढाकार घेतल्यास समाजातील कर्तृत्ववानांच्या कार्याला बळकटी मिळेल. तसेच त्यांचा हुरूप वाढेल. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

डॉ. प्रतापराव दिघावकर : कसमादेचा भूमिपुत्र असल्याचा मला अभिमान आहे. जिद्द व तळमळीने काम करण्याची निष्ठा या भागातील माणसांमध्ये आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील असल्याने मला संवेदनशीलतेची जाणीव आहे. ‘सकाळ’ने गौरवलेल्या भूमिपुत्रांच्या आईला प्रथमतः वंदन करतो. खरेतर विविध क्षेत्रांतील हे कर्मयोगी आहेत. तरुणांनी मोठी स्वप्ने पाहावीत. ती सत्यात उतरविण्यासाठी कठोर मेहनत घ्या. भूमिपुत्रांचा गौरव करून कर्तृत्ववानांचे कार्य समाजापुढे आणण्याचे काम ‘सकाळ’ माध्यम समूहाने केले आहे. 

भास्करराव पेरे-पाटील : ग्रामीण भागात मी जे काम केले ते माझ्याआधी अनेकांना करता आले असते. ग्रामीण भागातील जनतेने पुढाकार घेऊन आपल्या खेड्यांना पुढे नेले पाहिजे. खेड्यांचा विकास झाला तर शहरांचा विकास होईल. डॉ. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करा. देशातील प्रत्येक माणूस स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. राज्य, देश कर्जमुक्त व्हायला हवा. ‘सकाळ’ समूह भव्यदिव्य सोहळा घेऊ शकतो, मग सरकार का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शासनाने ग्रामीण भागातील कर्तृत्ववानांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली पाहिजे. 

प्रतीक्षा मुगणेकर : कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीत मी अभिनय क्षेत्रात आले. ग्रामीण भागातून मुंबईला येऊन अभिनयाचे धडे घेतले. शिक्षणाची आवड होती; मात्र कौटुंबिक कारणास्तव शिक्षण थांबवावे लागले. रिकाम्या वेळेत शूटिंग बघायला जायचे आणि पाठांतर चांगले असल्यामुळे भूमिका मिळाली. प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे अनपेक्षितपणे अभिनेत्री झाली. वडील रिक्षाचालक असतानाही मला खूप पाठिंबा दिला. माझ्या यशस्वी प्रवासात वडिलांचे मोठे योगदान असल्याचे तिने सांगितले. 

...या भूमिपुत्रांचा झाला गौरव 
स्वाती आडके (मेकअप आर्टिस्ट), रवी पवार (जाहिरात क्षेत्र), विजयालक्ष्मी आहिरे, सरोज शेवाळे, तनया भालेराव, वाल्मिक सोनवणे, सुखदेव उशीर, प्रभावती देशमुख, डॉ. दौलतराव गांगुर्डे, बन्सीलाल महाले (शैक्षणिक), ॲड. सुधीर अक्कर, नंदकुमार गायकवाड, अशोक देसले, जयपाल हिरे, राजू (राजेंद्र) खैरनार, साहेबराव कोर, गोकुळ अहिरे, प्रवीण अहिरे (प्रशासकीय), अजिंक्य बच्छाव (क्रीडा), कुसुम बच्छाव, भालचंद्र बगाड, कैलास देवरे, विलासकाका देवरे, वसंत गवळी, कौतिक पगार, भूषण पगार, दीपक पवार, सुरेश शेलार, दीपक अहिरे (सामाजिक कार्य), चेतन भामरे (वैद्यकीय), डॉ. निखिल भामरे, डॉ. कपिल कापडणीस, डॉ. अरुण पठाडे, डॉ. सुनील पवार, डॉ. दिग्विजय शाह, डॉ. दीपक शेवाळे, डॉ. निवेदिता हिरे, डॉ. किरण पाटील, डॉ. सचिन पाटील, डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. महेश तेलरांधे (आरोग्य), भाऊसाहेब जाधव, बापू जाधव, प्रमोद जाधव, दिलीप पाटील, नानाभाऊ वाघ (उद्योजक), दिलीप जाधव, दीपक जाधव, देवीदास कुमावत, कृष्णा भामरे (प्रगतिशील शेतकरी), पंकज जाधव (आर्किटेक्ट), सुनील महाजन (बॅंकिंग), डॉ. वैशाली पगार (कृषी तंत्रज्ञान).