कसमादेतील कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; कांदा उत्पादक चिंतित

देवळा (जि. नाशिक) : कसमादे भागात या वर्षी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड झाली असली तरी या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटणार आहे. औषध फवारणी करूनही करपा जात नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. 

शेतकऱ्यांनी महागडे बियाणे वापरून कांद्याची लागवड केली आहे; परंतु जानेवारीत झालेल्या अवकाळीमुळे उन्हाळ कांद्याला फटका बसला होता. ज्या भागात गारपीट झाली, तेथील कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले होते. त्या अवकाळीचा मोठा फटका देवळा तालुक्यातील लोहोणेर, सटवाईवाडी, सावकी, विठेवाडी, भऊर, खामखेडा शिवारातील कांद्यापिकाला बसला. त्याचा अनिष्ट परिणाम आता दिसून येत आहे. परिसरात अंदाजे ४० ते ५० टक्के लागवडीखालील क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचे प्रमाण दिसून येत आहे. इतर भागातही करपा रोग कमी-अधिक प्रमाणात आहेच. कांद्याची पात पिवळसर पडून कांद्याची वाढ खुंटते. यामुळे अपेक्षित उत्पादन निघत नाही. 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

अस्मानी अन् सुलतानी संकट 

वेळेवर वीजपुरवठा होत नसल्याने कांदा उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. शेतकरी दिवसरात्र एक करून कसेबसे कांद्याचे पीक जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. हे कमी की काय वातावरणात झालेल्या बदलामुळे अवकाळी पावसाचे संकट आ वासून उभे असल्याने कांदा उत्पादकांचे तोंडचे पाणी पळाले आहे. आता जर पाऊस आला तर त्यात कांद्याचे मोठे नुकसान होऊ शकते. करपा रोगामुळे बाधित झालेल्या उन्हाळ कांद्याचे शिवार पंचनामे करण्यात येऊन कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख कुबेर जाधव यांनी केली आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा