कसमादे पट्ट्यात कांदा साठवणुकीवर भर; उशिरा रोपे टाकल्याने काढणीला उशीर

खामखेडा (जि. नाशिक)  : कसमादे भागातील उन्हाळ कांदा काढणी सुरू झाली आहे. कांदा रोपातील फसगत, करपा रोग, वाढलेले तापमान व पाण्याचा फटका या मुळे लागवड क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत या वर्षी ४० टक्क्यांनी घट होण्याची स्थिती लक्षात घेत दर वर्षी मार्च महिन्याच्या सुरवातीला कांदा चाळीत साठवणुकीला सुरवात केली जाते. मात्र, चालू वर्षी उशिरा लागवडीमुळे मार्चएंडिंगला कांदा काढणी सुरू झाल्याने सध्या शेतकरी कांदा साठवणुकीच्या कामात गुंतला आहे. 

उन्हाळ कांदा मार्चच्या मध्यानंतर चाळीत साठवणूक केला जातो. बाजारभाव चांगला असल्याने टप्प्याटप्प्यात बाजारात नेला जातो. मात्र, चालू वर्षी मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे भाव कोसळले. दर वर्षी फेब्रुवारीच्या मध्यापासूनच शेतकरी कांदा साठवणूक करू लागतो. मात्र, चालू वर्षी उशिराच्या पावसाने कांदा रोपे खराब झाली. उशिरा रोपे टाकल्यामुळे जानेवारीअखेरपर्यंत कांदालागवड केली. 

लागवड केलेला कांद्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची फसगत झाली. अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेला उन्हाळ कांदा लाल निघाल्याने मार्च महिन्यात या कांद्याची बाजारात गर्दी झाल्याने मार्चएंडला बाजार बंद होण्यापूर्वी कांदा बाजार सरासरी ९०० ते एक हजारपर्यंत खाली आला. मोठ्या प्रमाणावर कांदालागवड झाली. मात्र, बोगस बियाणे, रोपात फसगत, तर अनेक भागांत पाणीपातळी खालावल्याने कांदा पिके सोडावी लागणार असल्याची स्थिती आहे. जानेवारीतील लागवड केलेला कांदा करपा आल्याने गळीत होणार नसल्याची स्थिती आहे. ही स्थिती पाहता व सध्या कांद्याला एक हजार रुपये भाव मिळत असल्याने डिसेंबरमधील लागवड केलेला कांदा शेतकरी चाळीत साठवत आहे. 

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप

सध्या कसमादे भागातील उन्हाळ कांद्याची काढणी सुरू झाल्याने व कांदा शेतात पडून राहण्यापेक्षा शेतकरी साठवणूक करण्याच्या जागेवर वाहून आणत साठविण्यासाठीची तयारी करत आहेत. डिसेंबरअखेरपर्यंतच्या बहुतांश कांद्याचे चांगले उत्पादन झाले असून, जानेवारी महिन्यातील लागवडीच्या उत्पादनावर पन्नास टक्क्यांहून अधिक घट होणार आहे. त्या मुळे शेतकरीवर्गाकडून सुरवातीच्या लागवडीच्या कांद्याची साठवणूक केली जात आहे. 

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार

चालू वर्षी उशिरा लागवड केलेल्या कांद्याचे उत्पादन निम्म्याने घटणार असल्याने शेतकरी अधिकाधिक कांदा साठवणूक करण्यावर भर देतील. 
-संजय बच्छाव, कांदा उत्पादक, खामखेडा