काँक्रिटीकरणामुळे ‘प्रोजेक्ट गोदा’ अडचणीत; कामांचे जळगाव कनेक्शनही चर्चेत 

नाशिक : जलसंपदा विभागाने गोदावरी नदीकिनारी आखलेल्या निळ्या व लाल पूररेषेत कुठल्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नसल्याचे आदेश दिले असतानाही स्मार्टसिटीअंतर्गत प्रोजेक्ट गोदा उभारण्याचे काम सुरू करताना सिमेंट काँक्रिटची भिंत उभारली जात असल्याने या कामाला गोदावरी गटारीकरण मंचाने विरोध केला असून, विभागीय आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आल्याने प्रकल्प अडचणीत सापडला आहे. 

गोदावरी गटारीकरण विरोधमंचाच्या वतीने उच्च न्यायालयात गोदावरी प्रदूषणासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने निरी या संस्थेमार्फत प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात सिमेंट काँक्रिटीकरणाला विरोध करण्यात आला आहे. लॉकडाउन काळात गोदावरी पात्रातील सिमेंट काँक्रिट हटविण्यात आले आहे. परंतू स्मार्टसिटीअंतर्गत प्रोजेक्ट गोदा प्रकल्प उभारताना नदीकिनारी सिमेंट काँक्रिटची भिंत उभारण्याचे काम सुरू आहे. 
एकीकडे नदीपात्रातील सिमेंट काँक्रिट उखडत असताना दुसरीकडे न्यायालय व जलसंपदा विभागाने निळ्या व लाल पूररेषेत कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करण्याचे आदेशित केले आहे. परंतु तरीही स्मार्टसिटी कंपनीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर पुलाजवळ काँक्रिटची भिंत उभारली जात आहे. नदीकिनारी गॅबियन तंत्रज्ञानाचा वापर करून भिंत बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसे न करता सिमेंटची भिंत उभारली जात असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरेल, अशी तक्रार गोदावरी गटारीकरण विरोध मंचाचे निशिकांत पगारे यांनी विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

हेही वाचा >> बारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत
 

स्मार्ट कामांचे जळगाव कनेक्शन 

स्मार्टसिटीअंतर्गत प्रोजेक्ट गोदाचे काम ज्या कंपनीला मिळाले आहे ती कंपनी बनावट पावत्यांच्या माध्यमातून खोटे इनपूट टॅक्स क्रेडिट मिळवल्याप्रकरणी नागपूरच्या जीएसटी महासंचालनालयाच्या रडारवर आहे. संबंधित कंपनीच्या संचालकाला गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. आता काँक्रिटीकरणा संदर्भात तक्रार करण्यात आली, तर दुसरीकडे प्रोजेक्ट गोदाची कामे करताना मूळ ठेकेदाराने उपठेकेदार नियुक्त केले. त्यात बोरा नामक व्यक्तीचा संबंध येत असल्याचे पुढे येत आहे. बोरा व बीएचआर घोटाळ्यासंदर्भातील संशयित सुनील झंवर यांचे संबंध असल्याने स्मार्टसिटीअंतर्गत कामांचे जळगाव कनेक्शन तपासले जात असल्याने एकूणच स्मार्टसिटी कंपनीची कामेदेखील यानिमित्ताने चर्चेत आली आहेत.  

हेही वाचा >> खळबळजनक! तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय