कांदाउत्पादक समस्यांच्या विळख्यात! आस्मानी, सुल्तानी संकट आ वासून उभे 

निवाणे (जि. नाशिक) : बोगस बियाणे, कांद्याचे घसरणारे दर, वीज कंपनीकडून वीजजोडणी खंडितची कारवाई, वीज रोहित्र जळाल्याने पाणी असून शेतात भरता येत नाही, पुन्हा लॉकडाउन लागण्याची धास्ती आणि अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी चारही बाजूने समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. 

वर्षापासून लॉकडाउनमध्ये निर्यात बंदमुळे शेतीमालाचे बाजारभाव गडगडले. लॉकडाउनमधून बाहेर पडून नवीन पिकांना सुरवात करतानाच अवकाळी पावसामुळे नुकसान सोसावे लागले. त्यात घरगुती कांदा बियाण्यांचे उत्पादन कमी प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांनी खासगी बियाणे कंपनी तसेच वैजापूर, जालना, औरंगाबाद भागातील शेतकऱ्यांकडून बियाणे मिळेल तेथून दोन हजार ते पाच हजार रुपये किलोच्या चढ्या भावाने कांद्याचे उळे व रोपे खरेदी केली. बहुतांश शेतकऱ्यांची बियाण्यात फसवणूक होऊन बोगस बियाण्यांमुळे डोंगळे तयार झाले आहेत. कृषी विभागाला बोगस कांदा बियाण्याच्या २७ तक्रारी प्राप्त झाल्या असून असंख्य शेतकऱ्यांनी बिलाअभावी तक्रार नोंदवू शकले नाहीत. त्यातच महावितरणच्या निवाणे कक्ष बेज व भेंडी उपकेंद्र कार्यक्षेत्रात कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने जवळपास दहाहून अधिक वीज रोहित्र जळाल्याने थकबाकी भरली तरच नवीन रोहित्र अशी भूमिका वीज कंपनीने घेऊन वसुलीचा रेटा लावला. त्यात लाल व उन्हाळ कांद्याचे बाजारभाव घसरले. शुक्रवारी (ता. १९) पहाटे अचानक वातावरण बदलून विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडल्या. त्याने शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

चोवीस हजारांचे बारा किलो उन्हाळ कांदा बियाणे काळे उळे जालना येथून खरेदी केले. ते लालकांद्याचे बोगस बियाणे निघून डोंगळे निघाले. रोहित्र जळाले वीज कंपनीला भरणा करावा लागला. कांद्याचे बाजार भाव कमी झाले, त्यात पुन्हा लॉकडाउन होण्याची धास्ती बसली आहे. 
- संजय आहेर, संकटग्रस्त शेतकरी, निवाणे. 

कळवण तालुक्यातून अतापर्यंत खराब कांदा बियाण्याच्या २७ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, कृषी विभाग पंचनामे करून दोषी कंपन्यावर कार्यवाही करेल. 
- राहुल आहेर, कृषी अधिकारी, पंचायत समिती, कळवण 

वीज कर्मचार्यांनी अहोरात्र काम करून थकबाकी नसलेल्या भागात वीज रोहित्र दुरुस्त करून देत आहोत. थकबाकीदार शेतकऱ्यांनी नवीन योजनेचा लाभ घेऊन वीजजोडणी खंडित करण्याची कार्यवाही टाळून महावितरणला सहकार्य करावे. 
- टी. टी. वाघ, कनिष्ठ अभियंता, निवाणे कक्ष 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती