कांदादरात उसळी! आवक मंदावल्याने वाढले बाजारभाव; ‘असे’ आहेत भाव

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवारी (ता. १) कांदा दरात सुधारणा झाली. प्रतिक्विंटल सरासरी ७०० रुपयांची सुधारणा झाल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाचा परिणाम कांदालागवडीवर झाला. त्यामुळे सध्या आवक मंदावल्यानेच बाजारभाव वाढले आहेत. 

कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या लाल कांद्याची आवक आहे. तर उन्हाळ कांदा अल्प प्रमाणात दाखल होत आहे. सरासरी १,५०० ते २,००० आणि जास्तीत जास्त २,५०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत असलेल्या लाल कांद्याने सोमवारी उसळी घेतली. दरात सरासरी ७०० ते ८०० रुपयांची अचानक वाढ झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. आशिया खंडात सर्वांत मोठी बाजार समिती समजल्या जाणाऱ्या लासलगावला जास्तीत जास्त ३,६११, तर सरासरी ३,२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत जास्तीत जास्त ३,६११, तर सरासरी ३,२०१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. उमराणे बाजार समितीत जास्तीत जास्त ३,७५१, तर सरासरी ३,३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

काय आहेत कारणे... 
नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे कांदालागवडीसाठी तयार केलेल्या रोपांचे नुकसान झाले. परिणामी, कांदालागवड उशिरा झाली. सध्या बाजारात लाल कांद्याची आवक मंदावली असल्याने बाजारभाव वाढले आहेत. गावठी कांदा बाजारात येण्यासाठी अजून एक महिना तरी लागणार असून, तोपर्यंत लाल कांदा भाव खाणार आहे. 

हेही वाचा - बालविवाह झालेल्या 'त्या' दुर्दैवी मुलीचा मृत्यू; आईची सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार

दर वर्षीच्या तुलनेत बाजारात ५० टक्क्यांनी कांदा आवक कमी आहे. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने कांदादर वाढले आहे. किमान महिनाभर तरी बाजारभाव चढेच राहतील. 
-सोहनलाल भंडारी, अध्यक्ष, नाशिक जिल्हा कांदा असोसिएशन 

 

यंदा अवकाळी पाऊस आणि सततच्या पावसाने कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे दर वर्षीच्या तुलनेत कांदालागवड उशिरा झाली. कांदा रोपे दोनवेळा खराब झाल्याने अनेकांनी लाल कांद्याऐवजी गावठी कांद्याला पसंती दिली. त्यामुळे सध्या बाजारात लाल कांद्याची आवक मंदावली आहे. गावठी कांदा तयार होईपर्यंत बाजारभावात तेजीच राहील. -बाबाजी गलांडे, कांदा उत्पादक, भोयेगाव (ता. चांदवड) 

 

बाजार समित्यांमधील १ फेब्रुवारीचे दर 
बाजार समिती सरासरी जास्तीत जास्त 

येवला ३,२०० ३,७४१ 
लासलगाव ३,२०० ३,६६१ 
कळवण ३,२०० ३,५७५ 
चांदवड ३,१०० ३,७९० 
मनमाड ३,३०० ३,६०० 
देवळा ३,५२५ ३,७१० 
उमराणा ३,३०० ३,७५१ 
पिंपळगाव ३,२०१ ३,६११ 

बाजार समित्यांमधील ३० जानेवारीचे दर 
बाजार समिती सरासरी जास्तीत जास्त 

येवला २,८५० ३,१७० 
लासलगाव २,७०० ३,२६० 
कळवण २,१०० २,५०० 
चांदवड २,७५० ३,३०२ 
मनमाड २,८०० ३,२०० 
पिंपळगाव २,८५१ ३,१६०