कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हमीभावासाठी लढा! ‘आपला कांदा, आपलाच भाव’ मोहिम

लासलगाव (जि.नाशिक) : कांद्याला प्रतिकिलो किमान ३० रुपये भाव मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे ‘आपला कांदा, आपलाच भाव’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची सुरवात सोमवारी (ता. १५) येथून करण्यात आली. 

हमीभावासाठी लढ्याला लासलगावहून सुरवात 
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधत मोहिमेचे स्वरूप व दिशा काय असेल, हे स्पष्ट केले. कांद्याच्या उत्पादनास एकरी ६५ ते ७० हजार रुपये खर्च येत असताना दर वर्षीच एक- दोन महिन्यांचा अपवाद वगळता राज्यभरातील सर्वच बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळतो. त्यातच बेमोसमी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, बोगस कांदा बियाणे, तर कधी कधी दुष्काळ अशा विविध कारणांनी शेतातच कांद्याचे मोठे नुकसान होत असते. या सर्व संकटांवर मात करून मोठ्या कष्टाने कांद्याचे उत्पादन घेतल्यानंतर शेतकऱ्यांना बाजार समितीत उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने, नेहमीच आर्थिक नुकसान सोसावे लागते.

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

शिवाय केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याला कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ मिळवणे आजपर्यंत शक्य झालेले नाही. देशात कांद्याचे ठोस असे कुठलेही धोरण ठरलेले नाही. याच पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे राज्य व केंद्र सरकारकडे हमीभावाची मागणी केली जाणार असल्याचे दिघोळे यांनी सांगितले. 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

‘आपला कांदा, आपलाच भाव’
याबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येणार असून, सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री या सर्वांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संघटनेचे महेश ठाकरे, सोमनाथ गिते, विलास दौंड, रवींद्र पगार, गौरीलाल पाटील, सजन सानप, वाळिबा गायकवाड आदी उपस्थित होते.