कांदा दरात घसरण! नवीन लाल अन्‌ उन्हाळ कांद्याची चार दिवसांमधील स्थिती

नाशिक : भावातील घसरणीचा टप्पा थांबून विशेषतः उन्हाळ कांद्याच्या भावात वाढ होण्याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या असल्या, तरी भावातील घसरण थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. उन्हाळ कांद्याच्या जोडीला नवीन लाल कांद्याच्या भावात चार दिवसांत क्विंटलला एक हजार रुपयांनी घसरण झाली आहे.

कांदा घसरण सुरूच

लासलगावमध्ये सोमवारी (ता. २३) उन्हाळ कांद्याला तीन हजार ४०० रुपये क्विंटल, असा सरासरी भाव मिळाला होता. शुक्रवारी दोन हजार ४०० रुपये क्विंटलवर समाधान मानावे लागले. मुंगसे-मालेगावमध्ये सोमवारी क्विंटलला तीन हजार ८५० या सरासरीने विकला गेलेला नवीन लाल कांदा आज दोन हजार ८०० रुपयांपर्यंत घसरला. दिवाळीपूर्वी उन्हाळ आणि लाल कांद्याला क्विंटलला सरासरी चार हजार रुपयांच्या पुढे भाव मिळत होता. त्यानंतर मात्र घसरण सुरूच आहे.

आवक वाढली

दिवाळीच्या सुट्यांनंतर प्रत्यक्ष लिलावाला सुरवात होण्यापूर्वी आवक वाढण्याबरोबर निर्बंधाच्या अफवांचे पीक सोशल मीडियातून पिकले. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात विक्रीसाठी आणला. त्यामुळे स्वाभाविकच भाव कोसळले. ही परिस्थिती पुढे आल्यानंतरही शेतकरी कांद्याच्या आवकेवर नियंत्रण ठेवतील, अशी आशा होती. प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. अशातच, आता काही बाजार समित्या शनिवार (ता. २८)पासून सोमवारपर्यंत (ता. ३०) सुट्यांमुळे बंद राहतील, तर काही बाजार समित्यांमध्ये रविवारी (ता.२९) आणि सोमवारी (ता. ३०) सुट्यांमुळे लिलाव होणार नाहीत. दरम्यान, चाळींमध्ये साठवलेला उन्हाळ कांदा अंतिम टप्प्यात पोचला आहे.

उन्हाळ कांद्याची चलती राहणार

नवीन लाल कांद्याची पूर्ण क्षमतेने आवक होण्यासाठी आणखी पंधरा दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्याची चलती राहणार, असे दिसते. अशावेळी शेतकऱ्यांनी कांदा टप्प्याटप्प्याने विक्रीस आणला, तर सुट्यांच्या पार्श्‍वभूमीवर शिल्लक उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळ कांद्याला क्विंटलला आज मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा (कंसात सोमवारी मिळालेला भाव) : नाशिक- तीन हजार २०० (चार हजार ९०), मुंगसे- दोन हजार ३०० (तीन हजार), चांदवड- दोन हजार ८०० (तीन हजार २००), मनमाड- दोन हजार ४०० (तीन हजार), पिंपळगाव बसवंत- तीन हजार ५१ (तीन हजार ९५१), देवळा- दोन हजार ९०० (तीन हजार ४००).

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

नवीन लाल कांद्याचा भाव
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)

बाजार समिती शुक्रवार (ता. २७) सोमवारी (ता. २३)
लासलगाव तीन हजार ५०० तीन हजार ८००
चांदवड चार हजार १०० चार हजार २००
मनमाड दोन हजार ४५० तीन हजार ५००
देवळा तीन हजार तीन हजार ८००
पिंपळगाव तीन हजार ४०१ चार हजार १०१

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली