
गेल्या दोन दिवसांत कांद्याच्या दरामध्ये सरासरी ७२५ रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (दि.1) उन्हाळ कांद्याला सरासरी ४२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. २७ ऑक्टोबर रोजी उन्हाळ कांद्याला सरासरी ४९२५ दर मिळाला होता. जिल्ह्यामध्ये दररोज साधारणत: एक लाख क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होत असून गेल्या पाच दिवसांत पाच लाख क्विंटल उन्हाळ कांद्याची जिल्हाभरात आवक झाली असून भाव तुटल्याने शेतकऱ्यांना सुमारे 36 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे दिसून येत आहे.
पुढील आठवड्यापासून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती दीपावलीनिमित्त बंद राहणार असल्याचे मेसेज व्हायरल होत असल्याने जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवकेमध्ये वाढ होत आहे. तर केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी कांद्याच्या किमान निर्यात मूल्य दरात आठशे डॉलर प्रतिताने वाढ केल्याने निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. तर नाफेडने साठवणूक केलेला दोन लाख टन कांदा किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो दराने विक्री सुरू झाल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्यावरील निर्यात मूल्य दर ८०० डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. किरकोळ बाजारात कांद्याने साठ रुपये किलोचा दर ओलांडल्याने केंद्राने धसका घेत ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शुक्रवारी किरकोळ बाजारातील कांद्याची विक्री ‘बफर स्टॉक’मधून 25 रुपये प्रति किलो या सवलत दराने करण्याचा निर्णय घेतला. ग्राहक व्यवहार मंत्रालय नॅशनल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया च्या माध्यमातून २ लाख टन कांदा किरकोळ बाजारात पाठविण्यास सुरवात झाली आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार सामितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी २०००, सरसरी ४२०० जास्तीत जास्त ४८९९ भाव मिळाले. तर लाल कांद्याला कमीत कमी १६००, सरसरी ३२०० जास्तीत जास्त ४२०० भाव मिळाला.
हेही वाचा :
- Maharashtra Board Exams 2024 : दहावीची परीक्षा 1 मार्च; तर बारावीची 21 फेब्रुवारीपासून
- Maratha Aarakshan : सरकारचे शिष्टमंडळ आज उपोषणस्थळी
- छत्रपतींच्या पुतळ्यामुळे राजकोट किल्ल्याला गतवैभव : ना. रवींद्र चव्हाण
The post कांदा दरात ७२५ रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना ३६ कोटींचा तोटा appeared first on पुढारी.