कांदा निर्यातबंदी : पाकने उठविली, भारतात जानेवारीत खुली करण्याची आवश्यकता

नाशिक : सिंध प्रांतातील नवीन कांद्याच्या ‘बंपर क्रॉप’मुळे पाकिस्तानने पंधरा दिवसांत निर्यातबंदी उठवली. मात्र, दुसरीकडे तुर्कस्थान, हॉलंडमधील कांदा संपत आला आहे. तसेच, चीनमधील नवीन कांदा बाजारात येण्यास जानेवारी उजाडणार आहे. त्याचवेळी तुर्कस्थान, इराण, इराक, इजिप्त, हॉलंडमधील नवीन कांदा मे ते जूनमध्ये बाजारात येईल. तोपर्यंत पश्‍चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील लाल कांद्याचे वीस टक्के अधिकचा कांदा देशांतर्गत बाजारात विकला जाईल. पण, जागतिक बाजारपेठेत पाकिस्तानला स्पर्धक राहणार नसल्याने देशातील कांदा निर्यातबंदी जानेवारीत खुली करण्याची आवश्‍यकता निर्माण झालेली आहे.

बंगाल, मध्य प्रदेशात २० टक्के अधिक उत्पादन

पाकिस्तानने या महिन्याच्या सुरवातीला कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला असताना टनाला ५६० ते ६०० डॉलर असा भाव होता. आता निर्यातबंदी उठवल्यानंतर पाकिस्तानच्या कांद्याचा टनाचा भाव ३५० ते ४०० डॉलर असा आहे. टनाला तुर्कस्थानचा ७०० आणि हॉलंडचा ८०० डॉलर असा भाव आहे. चीनमध्ये यंदा नवीन कांद्याचे मुबलक उत्पादन येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतात नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. त्याचबरोबर यंदा उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळालेला असताना चांगल्या पावसामुळे पाणी उपलब्ध असल्याने उन्हाळ कांद्याच्या लागवडीवर देशातील शेतकऱ्यांनी भर दिला आहे. स्वाभाविकपणे पुढील वर्षी उन्हाळ कांदा देशाच्या गरजेपेक्षा अधिक प्रमाणात उपलब्ध होईल, असा अंदाज आहे.

जानेवारीत खुली करावी लागणार निर्यात

पश्‍चिम बंगालमध्ये सुखसागर कांद्याचे २० ते ३० टक्क्यांपर्यंत अधिक उत्पादन अपेक्षित आहे. हा कांदा जानेवारी ते मार्चपर्यंत बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिसाच्या बाजारात विकला जाईल. शिवाय सध्या नवीन लाल कांद्याची आवक मध्य प्रदेशातून सुरू झाली आहे. हा कांदा दिल्ली, पंजाब, हरियानासह उत्तर भारतातील ग्राहकांना विकला जाईल. या कांद्याला देशांतर्गत ७० टक्के प्रतिसाद मिळतो. गुजरातमधील नवीन कांदा मार्चमध्ये बाजारात येईल. नैसर्गिक आपत्तीमुळे दक्षिणेतील कांद्याचे नुकसान झाले. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांनी पुन्हा नवीन कांद्याची लागवड केली आहे. हा कांदा जानेवारीत विक्रीसाठी येणार आहे.

महिनाभर किलोला ३० रुपयांची शक्यता

चाळींमध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साठवलेला उन्हाळ कांदा नेमका किती शिल्लक आहे, याचा अंदाज स्पष्ट झालेला नाही. पण नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे उन्हाळ कांदा संपल्याखेरीज नवीन कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. तरी देखील नवीन लाल कांद्याची मुबलक प्रमाणात आवक होण्यासाठी आणखी दोन आठवड्यांचा कालावधी अपेक्षित आहे. परिणामी, सध्या मिळत असलेल्या भावाची स्थिती पाहता, कांद्याला महिनाभर किलोला ३० रुपये भाव मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे दोन वर्षे भारतीय कांद्याची निर्यात झालेली नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे तुर्कस्थान, इजिप्त, इराण, इराक, हॉलंडमधील कांदा जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विकला गेला. पाकिस्तानच्या व्यापाऱ्यांनी मोठा फायदा उचलला आहे. आगामी काळात पाकिस्तान आणि चीनचा कांदा बाजारात राहण्यातून या दोन्ही देशांना फायदा होऊ नये म्हणून नव्या वर्षाच्या सुरवातीला कांद्याची निर्यातबंदी केंद्र सरकारने उठवणे गरजेचे आहे. - विकास सिंह, कांदा निर्यातदार