
लासलगाव : पुढारी वृत्तसेवा; नाफेड, एनसीसीएफमार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून २५ रुपये किलोदराने दोन लाख मेट्रिक टन कांद्याचे मुंबई, दिल्लीसह उत्तरेकडील मोठमोठ्या शहरांमध्ये वाटप सुरू झाले आहे. यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी धसका घेतला असून, गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरामध्ये (Onion News) दररोज घसरण होत आहे. शुक्रवारी (दि.3) कांद्याचे सरासरी दर प्रतिक्विंटल ३,७०० रुपयांच्या आत आल्याने गेल्या आठ दिवसांत 1,250 रुपयांची घसरण झाली. परिणामी कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे.
ऐन सणासुदीच्या तोंडावर गेल्या आठवड्यात 27 ऑक्टोबरला उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त 5,820 रुपये, सरासरी 4,900 रुपये इतका दर प्रतिक्विंटल मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान होते. राजस्थान, मध्य प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुका समोर ठेवून केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन लाख मेट्रिक टन कांदा २५ रुपये किलोप्रमाणे किरकोळ बाजारात वाटप करण्याचा निर्णय घेतला. तसेच निर्यात होणाऱ्या कांद्याचे निर्यातमूल्य दर 800 अमेरिकन डॉलर केल्याने त्याचा परिणाम घाऊक बाजारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून विक्री होणाऱ्या कांद्याच्या दरावर परिणाम झाला.
लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात दररोज घसरण होत असून, शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 777 वाहनांतून 10 हजार क्विंटल आवक झाली. त्याला जास्तीत जास्त 4,246 रुपये, कमीत कमी 1,400 रुपये तर सरासरी 3,650 रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. तर लाल कांद्याची आठ वाहनांतून 200 क्विंटल आवक झाली. त्याला जास्तीत जास्त 3,901 रुपये, कमीत कमी 1,151 रुपये तर सरासरी तीन हजार रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला.
शेतकरी हितासाठी फेरविचार करावा
केंद्र सरकार कांद्याबाबत चुकीचे धोरण राबवत असल्याने त्याचा परिणाम थेट कांदा बाजारभावावर होत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला समोर जावे लागत असल्याने केंद्र सरकारने आपल्या निर्णयाचा शेतकरी हितासाठी फेरविचार करावा, अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले यांनी केली आहे.
हेही वाचा :
- कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची कोंडी
- Pakistan | पाकिस्तानच्या मियांवली हवाई तळावर दहशतवादी हल्ला, ३ विमाने पेटवली, ३ दहशतवादी ठार
- कोल्हापूर : थेट पाईपलाईनच्या वीज पुरवठ्याची वायर कापल्याचा संशय
The post कांदा बाजारभावात घसरण सुरूच, क्विंटलचा दर 3,700 रुपयांच्या आत appeared first on पुढारी.