कांदा लिलाव तत्काळ सुरू करा; जिल्हा उपनिबंधकांचे बाजार समित्यांना आदेश 

मालेगाव कॅम्प (जि.नाशिक) : जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कांद्याचे लिलाव तब्बल नऊ दिवस बंद असल्याचे वृत्त बुधवारी (ता. ३१) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. नऊ दिवसांच्या बाजार बंदने कांदा दर घसरण्याची भीती शेतकरी बांधवांनी व्यक्त केली. या बातमीचे जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटले. सहकारमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हा उपनिबंधकांनी सर्व बाजार समित्यांना कांदा लिलाव तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. 

कांदा लिलाव तत्काळ सुरू करा
बाजार समिती बंदच्या निर्णयाने शेतकऱ्यांचा संताप झाला. सणासुदीच्या काळातील सुट्या, अवकाळीच्या फटक्यात आधीच कासावीस असलेल्या शेतकऱ्यांना कांदा भाव गडगडण्याचीही भीती होती. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संपर्कप्रमुख कुबेर जाधव यांनी फोनद्वारे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधून ‘सकाळ’मधील बातमीचा संदर्भ देत शेतकऱ्यांच्या तीव्र भावना कानावर घालत सकारात्मक चर्चा केली. बाजार समित्यांच्या बंदच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत कळवून बाजार समित्या सुरू ठेवण्याची विनंती केली.

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

जिल्हा उपनिबंधकांचे बाजार समित्यांना आदेश 

मंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भावनांची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांना संपर्क साधत कारवाईच्या सूचना केल्या. सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी बाजार समितीच्या प्रशासकांना बुधवारी (ता. ३१) सायंकाळी उशिरा पत्राद्वारे आदेश पारित करून लिलाव पूर्ववत करण्याच्या सूचना केल्या. २७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये सुटी वगळता बाजार समित्या बंद ठेवण्यात येऊ नयेत. शेतमाल उत्पादक, व्यापारी, ग्राहक व शेतकऱ्यांना पूर्णतः सुविधा पुरविण्यात याव्यात. त्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी. शेतकऱ्यांनी बाजार समिती आवारात शेतमाल विक्रीस आणल्यास लिलाव सुरू ठेवावा. शेतकऱ्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण