कांदे वादातूनच भुजबळांच्या राऊतांना शुभेच्छा

www.pudhari.news

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ

मागील वर्षी मतदारसंघात निधी वाटपावरून आमदार सुहास कांदे आणि माजी मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात वादंग निर्माण झाले होते. या दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की, त्याची चर्चा राज्यभर गाजली होती. कांदे यांनी या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील हेवीवेट नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले छगन भुजबळ यांच्याविरोधात थेट आक्रमक पवित्रा घेतल्याने या विषयाचे चर्वितचर्वण फार झाले. सोशल मीडिया आणि इतरही माध्यमांनी या घटनेची दखल घेतल्याने हा वाद ‘मातोश्री’वरही जाऊन पोहोचला. ‘मातोश्री’शी संबंध आल्याने उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख तथा खासदार संजय राऊत यांनी संपर्कप्रमुख या नात्याने कांदे यांच्या तक्रारीची दखल घेत, नांदगाव मतदारसंघ गाठला आणि छोटेखानी सभा घेत, शिवसेना तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत उघडपणे कांदे यांची पाठराखण करत एकप्रकारे भुजबळांनाही आव्हान दिले. हेच आव्हान लक्षात ठेवत भुजबळांनीही मग आता खासदार संजय राऊत हे ईडीच्या ताब्यात गेल्यानंतर तशाच स्वरूपाच्या शुभेच्छा देत परतफेड केल्याची चर्चा रंगत आहे. दिल्लीत संसदेच्या अधिवेशनात काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांच्या अटकेप्रकरणी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलेला असताना, इकडे राष्ट्रवादीचेच भुजबळ राऊतांना शुभेच्छा देत असल्याने चर्चा तर होणारच!

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासाची कामे केली जातात. अर्थात, या समितीचे अध्यक्ष ज्या गटाचे, त्या गटाचे प्राबल्य हे आपसूकच आलेच. आणखी दोन वर्षांनी विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे असल्याने त्यादृष्टीने आपला मतदारसंघ सुरक्षित राहावा, याकरिता लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न होणे स्वाभाविकच आहे. त्याच अनुषंगाने आमदार सुहास कांदे यांनी नांदगावसाठी मिळालेल्या निधीवरून थेट भुजबळांशीच पंगा घेतला. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारही केली. त्यानंतरही निधीबाबतच्या निर्णयात बदल न झाल्याने कांदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतच आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे यंत्रणाही हादरली होती. बैठकीत कांदे यांनी तोंडसुख घेत समिती अध्यक्षांनी येवला मतदारसंघासह राष्ट्रवादी काँग्रेसच्याच आमदारांना निधीचे वाटप किती आणि कसे केले गेले, याचा पाढाच वाचला. त्याचबरोबर निधीसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून कांदे यांनी न्यायालयात दावाही दाखल केला होता. या सर्व प्रकारानंतरही भुजबळांनी नमते धोरण घेतले, याचे विशेष वाटले.

नांदगाव मतदारसंघ हा कांदेंआधी भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांच्या ताब्यात होता. परंतु, मागील विधानसभा निवडणुकीत कांदे यांनी भुजबळांना धोबीपछाड देत, त्या ठिकाणी शिवसेनेची डरकाळी फोडली. कांदे – भुजबळ वाद विकोपाला गेल्याने या वादात शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी उडी घेत कांदे यांना पाठबळ दिले. या पाठबळानंतरही माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्याकडे कानाडोळा केला. ज्या भुजबळांनी दोन अडीच वर्षे ईडीच्या फेर्‍यात काढले, त्याच ईडीने संजय राऊतांना आपल्या पंजात जखडल्याने भुजबळांकडून आलेली प्रतिक्रिया उत्स्फूर्त म्हणावी लागेल. ईडीच्या कायद्यातून लवकर जामीन मिळत नाही. त्यामुळे संजय राऊतांना माझ्याकडून शुभेच्छा, अशा शब्दांतील शुभेच्छा खूप काही सांगून जातात. या शुभेच्छांतून कदाचित भुजबळांनी, राऊत यांनी कांदे आणि आपल्या वादात मारलेल्या उडीचे उट्टे काढलेले दिसते. त्यामुळेच भुजबळ यांनी दिलेल्या शुभेच्छा हा चर्चेचा विषय ठरला असून, ईडीचे शिल्पकार काँग्रेसच असल्याची आठवणही त्यांनी करून देत केंद्र सरकारशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच त्यांनी आता भाजपला नावे कशी ठेवायची, असा प्रश्न उपस्थित केला आणि त्यातच राऊतांना शुभेच्छा देत आपला चाणाक्षपणाही दाखवून दिला असावा.

सुहास कांदे यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध
महाविकास आघाडी सरकारला घरी बसवल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने आघाडीच्या अनेक निर्णय आणि विकासकामांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यापैकीच एक म्हणजे छगन भुजबळ अध्यक्ष असलेल्या नाशिक जिल्हा नियोजन समितीने चालू आर्थिक वर्षासाठी नियतव्यय मंजूर केलेल्या सुमारे 600 कोटींची कामे रद्द करण्याचा निर्णय घेत भुजबळांना धक्का देऊ केला आहे. त्यामुळे शिंदे गटामध्ये सामील झालेल्या आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांसमोर आणखी एकदा वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे गटाचे सरकार असल्याने या सरकारच्या माध्यमातून मतदारसंघासाठी अधिकाधिक निधी वळता करून त्याद्वारे मतदारसंघात आपला पाय अधिक घट्ट कसा रोवता येईल, याकरिता कांदे प्रयत्न करतील आणि त्यावर भुजबळ कशी मात करतात, हे आगामी राजकीय नाट्यावेळी दिसून येईलच!

हेही वाचा:

The post कांदे वादातूनच भुजबळांच्या राऊतांना शुभेच्छा appeared first on पुढारी.