कांद्याचा भाव पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा ‘पॅनिक सेल’; रोज दीड लाख क्विंटलपर्यंत आवक

नाशिक : नवीन लाल कांदा विक्रीसाठी हळूहळू वाढू लागल्याने भावातील घसरण दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गेलेल्या कांद्याला आता सरासरी अठराशे ते एकवीसशे रुपयांवर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे आताचा भाव पदरात पाडून घेण्यासाठी ‘पॅनिक सेल’ सुरू झालाय.

परिणामी एका आठवड्यात रोजची ७० हजार क्विंटलने आवक वाढून दिवसाला दीड लाख क्विंटलपर्यंत कांदा विक्रीसाठी येत आहे. त्यापैकी ६० टक्के कांदा तमिळनाडूकडे रवाना होत आहे. इथल्या व्यापाऱ्यांना आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्यांच्या मागणीची प्रतीक्षा आहे. 

कांद्याचे आगर असलेल्या लासलगावमध्ये दोन हजार ४०० रुपये क्विंटल भावाने चोवीस तासांपूर्वी कांद्याची विक्री झाली. गुरुवारी (ता.१७) सकाळी त्यात दोनशे रुपयांची घसरण झाली. सायंकाळी पुन्हा दोनशे रुपयांनी भाव घसरले. पिंपळगावमध्ये दिवसभरात १२ हजार ४०० क्विंटल नवीन लाल कांद्याची आवक झाली. त्यास सरासरी दोन हजार ४०१ रुपये असा आज भाव मिळाला. नवीन लाल कांदा गुरुवारी मुंगसेमध्ये दोन हजार १५०, चांदवडमध्ये एक हजार ८००, मनमाडमध्ये दोन हजार, देवळ्यात दोन हजार १००, उमराणेत दोन हजार रुपये क्विंटल असा सरासरी भाव मिळाला आहे. देवळ्यात २४ तासांत ५५०, तर मनमाडमध्ये ३००, चांदवडमध्ये ४०० रुपये क्विंटल अशी भावात घसरण झाली. अंतिम टप्प्यात पोचलेल्या उन्हाळ कांद्याचे भाव आज क्विंटलला चौदाशे ते एक हजार ९०० रुपये क्विंटलपर्यंत घसरले आहेत. बुधवारी (ता. १६) सतराशे ते बावीसशे रुपयांपर्यंत क्विंटलचा सरासरी भाव मिळाला होता. 

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

कर्नाटकचा नवीन कांदा आठ दिवसांत 

मध्य प्रदेशात नवीन कांद्याची आवक मुबलक प्रमाणात आहे. राजस्थानमध्ये हीच स्थिती आहे. कर्नाटकमध्ये पावसाने कांद्याचे नुकसान केले. त्यानंतर शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील कांद्याची आवक येत्या आठवडाभरात सुरू होण्याची शक्यता आहे. शिवाय नाशिकप्रमाणेच नगर आणि पुण्याच्या कांद्याच्या पट्ट्यातून नवीन कांद्याची आवक वाढली आहे. नेमक्या याच कारणास्तव कांद्याचे भाव कोसळत आहेत. ही सारी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची मागणी लावून धरली आहे. व्यापाऱ्यांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या सुरात सूर मिसळत कांद्याची निर्यातबंदी उठवण्याची योग्य वेळ असल्याचे सांगायला सुरवात केली आहे. 

 
देशातंर्गत कांद्याचे आजचे भाव 

(क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 
बेंगळुरू ः स्थानिक- दोन हजार ३०० आणि पुणे दोन हजार ४०० 
देवास (मध्य प्रदेश) ः तीन हजार 
अजमेर (राजस्थान) ः दोन हजार ४०० 
आग्रा (उत्तर प्रदेश) ः तीन हजार ४० 
लखनौ ः दोन हजार ६०० 
अलाहाबाद ः दोन हजार ७०० 
असन्सोल (पश्‍चिम बंगाल) ः दोन हजार ९०० 

 हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

 
आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये सोलापूरसह कर्नाटकमधील सीमावर्ती भागातून कांदा विक्रीसाठी जातोय. पण तरीही तमिळनाडूसाठी नाशिकच्या कांद्याला मागणी आहे. आंध्र प्रदेशच्या ग्राहकांसाठी नाशिकचा कांदा खरेदी होण्याची स्थिती आता तयार झाली आहे. याशिवाय पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, आसामसाठी नाशिकचा कांदा रवाना होत आहे. 
- नितीन जैन, कांदा व्यापारी, लासलगाव